अखेर महापालिकेला खड्डे दिसले...
By admin | Published: June 14, 2015 12:01 AM2015-06-14T00:01:29+5:302015-06-14T00:01:29+5:30
‘लोकमत’चा दणका : महापालिकेकडून रस्त्यांची दुरुस्ती सुरू
सांगली : मृत्यूचे सापळे बनून नागरिकांना छळणारे खड्डे अखेर महापालिकेला दिसले. ‘लोकमत’ने या विषयावर प्रकाशझोत टाकल्यानंतर महापालिका प्रशासनाने त्याची दखल घेत शनिवारी सर्व धोकादायक खड्डे खडी व डांबराने भरून घेतले. लवकरच पॅचवर्कही केले जाणार आहे. किमान खड्डे भरून घेतल्यामुळे नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास टाकला आहे.
पावसाने शहराची दैना उडाली असतानाच, शहरातील मुख्य रस्ते आता मृत्यूचे सापळे बनले आहेत. पाणी, गटारी व ड्रेनेजचे खड्डे महिनोन् महिने खुलेच राहिले असून, यामध्ये पडून गेल्या आठ दिवसात अठराजण जखमी झाले आहेत. काही ठिकाणी ठेकेदारांनी अर्ध्यावरच काम सोडल्याने ही अवस्था निर्माण झाली आहे. याबाबत ‘लोकमत’ने शनिवारी वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल घेत शनिवारी रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम महापालिकेने हाती घेतले. तातडीच्या कामांमधून ही दुरुस्ती सुरू आहे.
शहरातील राजवाडा चौकानजीक कामगार विमा रुग्णालयासमोरील मुख्य रस्त्यावरील गटारीवरील सुमारे चार फूट रुंद, दोन फूट लांब व सुमारे तीन फूट खोलीचा खड्डा गेल्या वर्षभरापासून खुला आहे. सिटी पोस्टासमोर व बीएसएनएल कार्यालयासमोरही ड्रेनेजचे खुले खड्डे आहेत. हे खड्डेही वर्षापासूनच उघडेच आहेत. गेल्या चार दिवसांपासून पोलिसांनी या खड्ड्याभोवती ‘काम सुरू’ असा फलक लावला आहे. शंभर फुटीवरून शामरावनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच साई कॉलनीनजीक सुमारे चार फूट लांबी- रुंदीचा व पाच फूट उंचीचा ड्रेनेजचा खड्डा सहा महिन्यांपासून खुला आहे. गेल्या आठ दिवसांत याठिकाणी पाचजण पडून जखमी झाले आहेत. शंभर फुटी रस्त्यावर त्रिमूर्ती कॉलनी चौकासमोर वीस ते तीस फुटाच्या पाईप गेल्या सहा महिन्यांपासून टाकण्यात आल्या आहेत. यावर अनेकदा मोटारी आदळत आहेत. मुख्य रस्त्यावरील खुले ड्रेनेज, पाईप, खड्ड्यांमुळे नागरिकांना मात्र जीव मुठीत धरुन जावे लागत आहे.
नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असताना याबाबत आलेल्या निवेदनांना कचऱ्याची टोपली दाखविण्यात आली होती. ‘लोकमत’ने याबाबतचे सचित्र दर्शन घडविल्यानंतर महापालिकेला हे खड्डे दिसले. त्यांनी शनिवारी दिवसभर याठिकाणचे खड्डे भरून घेतले. पॅचवर्कचेही काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)