दम असेल तर शोधून दाखवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:15 AM2019-12-16T00:15:06+5:302019-12-16T00:15:33+5:30
दत्ता यादव । सातारा : अनेकदा चोरी झाल्यानंतर पुरावे मागे राहू नयेत म्हणून चोरटे खबरदारी घेतात. मात्र, साताऱ्यात एक ...
दत्ता यादव ।
सातारा : अनेकदा चोरी झाल्यानंतर पुरावे मागे राहू नयेत म्हणून चोरटे खबरदारी घेतात. मात्र, साताऱ्यात एक अजब प्र्रकार घडलाय. चोरट्याने पुरावा म्हणून चक्क स्वत:चे हस्ताक्षर पाठीमागे सोडले आहे. दीड लाखाची चोरी केल्यानंतर चोरट्याने दरवाजावर चिठ्ठी चिटकवून ‘दम असेल तर शोधून दाखवा,’ असे चॅलेंज पोलिसांना दिले आहे.
सातारा शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या देगाव फाटा येथे ‘टॉप जीम’ या नावाची जीम आहे. ही जीम अत्याधुनिक असून, युवती आणि मुलेही या ठिकाणी येऊन रोज व्यायाम करतात. गेल्या काही दिवसांपूर्वी सकाळी जीम उघडताना मुलांना एक अजब प्रकार पाहायला मिळाला. दरवाजावर एक चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीवर ‘दम असेल तर शोधून दाखवा..गब्बर,’ असे लिहिले होते. हा काय प्रकार आहे? हे मुलांना समजत नव्हते. जीममध्ये प्रवेश केल्यानंतर जीमधील अत्यंत महागडी साऊंड सिस्टीम चोरीस गेल्याचे पवन माने यांच्या निदर्शनास आले. संबंधित चोरट्याने वायरसह साऊंड सिस्टीम चोरून नेली. विशेष म्हणजे या साऊंड सिस्टीमची वायर तब्बल तीस हजार रुपयांची होती. अशी दीड लाखाची साऊंड सिस्टीम चोरट्याने लंपास केली. केवळ साऊंड चोरून नेले असते तर त्याचा उपयोग झाला नसता. त्यामुळे चोरट्याने वायरसह साऊंड सिस्टीम चोरून नेल्याचे पुढे आले आले.
जीमचे जीवन जाधव आणि प्रीतम जाधव यांनी या घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतली. जुजबी चौकशी करून पोलीस तेथून निघून गेले. मात्र, अद्याप या चोरीचा छडा पोलिसांना लावता आला नाही.
चोरट्याने एक प्रकारे पोलिसांना आव्हानच दिले आहे. पोलिसांनी मनावर घेऊन खरंतर या चोरीचा छडा लावणे गरजेचे होते. मात्र, चोरट्याने खोडसाळपणे असे लिहिले असेल, असे समजून पोलिसांनीही याकडे साफ दुर्लक्ष केले. खुद्द पोलिसांनाच चोरट्याने डिवचल्याने सातारा शहरात खुमासदार चर्चा आहे. दहा गुन्हे दाखल होतील, तेव्हा कुठे एक गुन्हा उघडकीस येईल, अशी सध्या पोलिसांची अवस्था आहे. चोरट्यांचे चॅलेंज स्वीकारणे तर दूरच.
हस्ताक्षर तज्ज्ञांची
घ्यायला हवी होती मदत..
जीममध्ये अनेक मुले रोज व्यायामासाठी येत आहेत. ही चोरी माहीतगाराकडून झाली असावी, अशी शक्यताही पोलिसांकडून वर्तविण्यात आली. परंतु पोलिसांनी पुढे काहीच केले नाही. हस्ताक्षर तज्ज्ञांची मदत घेऊन पोलिसांनी प्रत्येक मुलाचे हस्ताक्षर तपासणे गरजेचे होते. मात्र, पोलिसांनी काहीच हालचाली न केल्यामुळे चोरट्याने पोलिसांना दिलेले चॅलेंज आता खरे होतेय की काय, असे साताºयातील मुलांना वाटू लागले आहे. ही चोरी शेवटपर्यंत लाल फितीच्या कारभारात बंद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या चोरीचे चॅलेंज स्वीकारून पोलिसांनी याचा छडा लावला असता तर पोलीस वरचढ ठरले असते.
बिहार पोलिसांची आठवण...
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हातात दारूची बाटली घेऊन एक युवक दारू कुठून आणली अन् बिहार पोलीस कसे हप्ते घेतात, हे तो सांगत होता. पोलिसांनी त्यानंतर तत्काळ अवैध दारूप्रकरणी युवकाला बेड्या ठोकल्या.