Satara: ‘जाळरेषा’ रोखणार वणव्याची धग !, वन विभागाने केले सूक्ष्म नियोजन
By संजय पाटील | Updated: February 17, 2025 17:14 IST2025-02-17T17:13:00+5:302025-02-17T17:14:38+5:30
कऱ्हाड तालुक्यात महादेव डोंगररांगेवर विशेष लक्ष

Satara: ‘जाळरेषा’ रोखणार वणव्याची धग !, वन विभागाने केले सूक्ष्म नियोजन
संजय पाटील
कऱ्हाड : तालुक्यात डोंगररांगांची संख्या जास्त असून त्याठिकाणी वनसंपदाही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, दरवर्षी वणव्यात या वनसंपदेला हानी पोहोचते. वृक्ष, प्राणी आणि पक्ष्यांची आश्रयस्थाने तसेच सरपटणारे जीव वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडतात. यंदा वणव्याची ही धग रोखण्यासाठी वन विभागाने सूक्ष्म नियोजन केले असून तालुक्यात १६ हजार ५०० हेक्टर वनक्षेत्रात जाळरेषा आखली जात आहे.
कऱ्हाड तालुक्यातील विविध भागातील वनहद्दीत गड तसेच डोंगररांगा आहेत. या डोंगरांना उन्हाळ्यात लागणारा वणवा आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाने जाळरेषा आखण्याचे काम हाती घेतले आहे. तब्बल १६ हजार ५०० हेक्टर वनक्षेत्रात जाळ रेषा आखली जात असल्यामुळे गड व डोंगरांवरील वणवा आटोक्यात येण्यास हातभार लागणार आहे. वनहद्दीपासून पाच फुट नागरी वस्तीच्या दिशेने सर्व गड आणि डोंगरांच्या कडांवर ही जाळरेषा काढली जात आहे. त्यामुळे डोंगरांवरील औषधी वनस्पती, इतर वृक्ष, सरपटणारे प्राणी आणि पक्ष्यांची आश्रयस्थाने वाचविण्यात यश येण्याची अपेक्षा वन विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
तालुक्यातील सुमारे १६ हजार हेक्टर क्षेत्र प्रादेशिक वन विभागाच्या हद्दीत येते. तो भाग डोंगरदऱ्यांचा व गडकोटांचा आहे. त्यामध्ये वसंतगड, सदाशिवगड, आगाशिवगड आदी ऐतिहासिक गडांसहीत अन्य डोंगररांगांचा समावेश आहे. महादेव डोंगररांग ही अत्यंत महत्त्वाची डोंगररांग आहे. या रांगेत वनविभागातर्फे मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे.
वणवा लागू नये म्हणून..
- डोंगरालगत शेतीचा बांध जाळताना वन कार्यालयाला माहिती द्या.
- वनात फिरायला जाताना अग्निजन्य वस्तू घेऊन जाऊ नका.
- डोंगरात किंवा डोंगरातून जाणाऱ्या रस्त्याने सिगारेट ओढू नका.
- कोणत्याही कारणाने आग लावण्याचा प्रयत्न करू नका.
वनक्षेत्र का महत्त्वाचे ?
- डोंगरात गवत किंवा झाडांची मुळे पाणी धरून ठेवतात.
- जमिनीतल्या पाणी पातळीत वाढ होऊन जलस्रोत वाढतात.
- गवतामुळे डोंगराची माती वाहून जात नाही.
- गवताने उन्हाची तीव्रता कमी होण्यास मदत मिळते.
- पशुपक्ष्यांना निवारा मिळाल्याने निसर्गचक्र सुधारते.
- वनक्षेत्र हिरवे राहिल्यास मानव-वन्यप्राणी संघर्ष टळतो.
वणवा लावणाऱ्यास शिक्षेची तरतूद
वणवा लावताना कोणी सापडल्यास त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल होतो. त्यामध्ये शिक्षेचीही तरतूद आहे. कऱ्हाडात काही महिन्यांपूर्वी एकास २० हजार रुपये दंड व कैदेची शिक्षा झाली आहे. वनसंपत्तीचे जास्त नुकसान झाल्यास जास्त शिक्षा व दंड होवू शकतो.
पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा डोंगररांगांवर मोठ्या प्रमाणात गवत उगवले आहे. इतर झाडे झुडूपेही वाढली आहेत. वणव्यात ही वनसंपदा नष्ट होऊ नये तसेच प्राणी व पक्ष्यांना हानी पोहोचू नये, यासाठी जाळरेषा काढण्यात येत आहे - ललिता पाटील, परिक्षेत्र वनाधिकारी, कऱ्हाड