Satara: आगाशिवनगर घनकचरा प्रकल्पात अग्नितांडव, कोट्यवधीचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 12:01 PM2024-02-29T12:01:36+5:302024-02-29T12:01:56+5:30
बेल्ट कन्वेअर, बेलींग मशीन, सोलर पॕनलसह शेड जळून खाक
माणिक डोंगरे
मलकापूर : आगाशिवनगरात घनकचरा प्रकल्पाला लागलेल्या आगीत बेल्ट कन्वेअर, बेलींग मशीन, सोलर पॕनलसह शेड व रॉमटेरिअल जळून खाक झाले. या आगीत कोठ्यावधी रूपयाचे नुकसान झाले आहे. आगाशिवनगर येथील माळीनगर नजीक बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रात्रीच्या वेळी कोणीही नसल्यामुळे सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. कराड पालिका, कृष्णा हॉस्पिटल अग्निशमन यंत्रणेच्या सहाय्याने सुमारे पाच तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आगाशिवनगर येथील घनकचरा प्रकल्पात आग लागल्याचे आसपासच्या नागरिकांच्या निदर्शनास आले. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. बघता बघता आगीचे लोळ बाहेर पडू लागले.
आगीची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी प्रताप कोळी यांच्यासह सर्व आजी माजी नगरसेवक व पालिकेचे अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत काही नागरिकांनी आगीची माहिती कराड नगरपालिका, कृष्णा हॉस्पिटल अग्निशामक दल यंत्रणेला दिली. माहिती मिळताच कृष्णा रुग्णालय व त्यानंतर काही वेळातच कराड नगरपालिकेचे अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. चहुबाजूनी पाण्याचा मारा सुरू झाल्याने सुमारे पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. तोपर्यंत प्रकल्पातील बेल्ट कन्वेअर, बेलींग मशीन, सोलर पॕनल, शेड, वायरींगसह रॉमटेरिअल जळून खाक झाल्याने कोठ्यावधी रूपयाचे नुकसान झाले आहे.
मलकापूर पालिकेचे तातडीने पाणी
येथील नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय जवळच असल्यामुळे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रसंगावधान राखत आलेल्या अग्निशामक दलाच्या गाड्यांना तातडीने पाणीपुरवठा केला.