साताऱ्यातील वडगाव हवेली येथे जलवाहिनीच्या गोदामाला आग, योजनेचे काम सुरू होण्यापूर्वीच दुर्घटना; कोट्यवधीचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 04:27 PM2023-03-04T16:27:14+5:302023-03-04T16:27:50+5:30
आगीचे कारण अद्याप अस्पष्टच
संतोष खांबे
वडगाव हवेली : कऱ्हाड तालुक्यातील वडगाव हवेली येथे जलजीवन मिशनअंतर्गत होणारे चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजनेसाठी उपलब्ध केलेल्या जलवाहिन्याच्या साठ्याला काल, शुक्रवारी मध्यरात्री अचानक आग लागली. याआगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
वडगाव येथील ग्रामपंचायतीची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने सुमारे ११ कोटी रकमेची चोवीस बाय सात योजनेचे काम काही दिवसांतच सुरू होणार होते. यासाठी लागणाऱ्या एचडीपी प्रकारच्या विविध आकाराच्या जलवाहिन्या गेली महिनाभरापूर्वी या ठिकाणी ठेवल्या होत्या. येथील ग्रामपंचायतीने प्राथमिक आरोग्य केंद्र शेजारील बाजार पटांगणावर जलवाहिन्यांचा साठा केला होता. शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास अचानक आग लागली.
आग इतकी प्रचंड प्रमाणात होती की काही वेळेतच आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी ग्रामपंचायतीकडून कृष्णा कारखाना, कृष्णा हॉस्पिटल व कऱ्हाड नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. या अग्निशमन यंत्रणा आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करत होत्या, परंतु आग आटोक्यात येत नव्हती. सुमारे एक ते दीड तासाने आग विझविण्यात यश आले.
जलवाहिनी गोदामाशेजारीच जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत आहे. या ठिकाणी शाळा सुरू नसली तरी काही खोल्यांमध्ये शालेय साहित्य ठेवण्यात आले होते. आगीमध्ये या शालेय साहित्याचेही नुकसान झाले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, पोलिस यंत्रणा, ग्रामपंचायत प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. या आगीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. आगीबाबत शनिवारी सकाळी कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.