शॉर्टसर्किटमुळे इमारतीला आग

By admin | Published: October 9, 2014 09:27 PM2014-10-09T21:27:14+5:302014-10-09T23:07:52+5:30

तिसरा मजला खाक : लोणंद येथील घटनेत सुमारे ७४ लाखांचे नुकसान

Fire at the building due to the short circuit | शॉर्टसर्किटमुळे इमारतीला आग

शॉर्टसर्किटमुळे इमारतीला आग

Next

लोणंद : लोणंद, ता. खंडाळा येथील तानाजी चौकात असलेल्या नितीन कांतिलाल शहा यांच्या इमारतीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामध्ये दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे आगडोंब उसळून इमारतीचा तिसरा मजला खाक झाला. नीरा ज्युबिलंट, किसन वीर कारखाना, पुणे महानगरपालिका आणि स्थानिक पाण्याच्या टँकरच्या मदतीने आग विझविण्यात आली. या आगीत ७३ लाख ७२ हजारांचे नुकसान झाले.
याबाबत माहिती अशी की, सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शहा यांच्या इमारातील आग लागली. आगीचा भडका एवढा मोठा होता की आग विझविण्यासाठी जवळ जाण्यासही कोणी धजावत नव्हते. गावातील बिपीन शिंदे, कालिदास शेलार, सागर डोईफोडे, सोमनाथ जाधव, अनिल शहा, मुबीन बागवान, नंदकुमार रोकडे, मयुर क्षीरसागर, सचिन दीक्षित, सागर शेळके, मोईन बागवान, राजेश भाटिया यांनी घरातील साहित्य बाहेर काढले.
आग लागल्याचे वृत्त समजताच लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजित दळवी व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. तसेच नीरा ज्युबिलंट, किसन वीर साखर कारखाना यांच्या अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग एवढी उसळली होती की गाड्यांमधील पाणी संपले; पण आग आटोक्यात आली नाही. भिकुलाल शेळके यांच्या दोन टँकरनी पाणी आणून ते अग्निशामन दलाच्या गाड्यांमध्ये भरले. त्यानंतर पुणे महानगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. सर्वाच्या मदतीने अखेर आग विझविण्यात यश आले.
जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, खंडाळ्याचे तहसीलदार शिवाजी तळपे, मंडलाधिकारी बी. आर. माने, तलाठी बी. सी. लावंड यांनी पंचनामा केला. आगीत ७३ लाख ७२ हजार ८४० रुपयांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)

लोणंद ही मोठी बाजारपेठ आहे. अशा घटना लोणंदमध्ये वारंवार घडत आहेत. तरीही लोणंदमध्ये अग्निशामक दलाची गाडी असावी, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या इमारतीत गॅस सिलिंडर होते. युवकांनी धाडस करून चार सिलिंडर बाहेर काढले. मात्र, दोन सिलिंडरचा स्फोट होऊन मोठा आवाज झाला. यामुळे आग आणखीनच भडकली. युवकांनी सिलिंडर बाहेर काढले नसते तर मोठा अनर्थ घडला असता, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

Web Title: Fire at the building due to the short circuit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.