उसाच्या फडाला आग; सव्वा लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:23 AM2021-03-30T04:23:29+5:302021-03-30T04:23:29+5:30
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ या ठिकाणी उसाच्या क्षेत्राला लागलेल्या आगीमध्ये अंडजाई १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाले ...
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ या ठिकाणी उसाच्या क्षेत्राला लागलेल्या आगीमध्ये अंडजाई १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिरवळ येथील नीरा नदीच्या काठालगत एका अपार्टमेंट शेजारी नीरा-देवघर धरणातील प्रकल्पग्रस्त व साळव पुनर्वसन ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश बाजीराव साळेकर यांच्या मालकीचे क्षेत्र आहे. यामध्ये साधारणपणे ८८ गुंठे क्षेत्रापैकी ३० गुंठे क्षेत्रामध्ये प्रकाश साळेकर यांनी उसाची लागवड केली आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी प्रकाश साळेकर हे कुटुंबीयांसमवेत धुळवड असल्याने साळव पुनर्वसन या ठिकाणी गेले होते.
यावेळी अचानकपणे संबंधित उसाच्या क्षेत्राला आग लागल्याचे तेथील रहिवाशांच्या निदर्शनास आले. यावेळी रहिवाशांनी याबाबतची कल्पना दूरध्वनीद्वारे प्रकाश साळेकर यांना दिली असता, प्रकाश साळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, प्रकाश साळेकर यांनी उपस्थित नागरिकांच्या मदतीने उसाच्या क्षेत्राला लागलेली आग विझविण्यात यश आले. यावेळी साधारणपणे ३० गुंठे क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याने अंदाजे १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. शिरवळ पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.