अग्निशमन नळकांडे प्रवाशांच्या दृष्टिआड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:49 AM2021-02-20T05:49:16+5:302021-02-20T05:49:16+5:30
सातारा : साताऱ्यातील शिवशाही जळीत घटनेत अधिकारी, कर्मचारी अन् प्रवाशांनी दाखविलेले प्रसंगावधान अन् वेळीच अग्निशमन बंब दाखल झाल्याने अनर्थ ...
सातारा : साताऱ्यातील शिवशाही जळीत घटनेत अधिकारी, कर्मचारी अन् प्रवाशांनी दाखविलेले प्रसंगावधान अन् वेळीच अग्निशमन बंब दाखल झाल्याने अनर्थ टळला. त्यानंतर एसटीचे अधिकारी अधिक सावध झाले. विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. मात्र अजूनही एसटीतील अग्निशमन नळकांडी चालकाच्या केबिनमध्ये असते. ते बाहेर गेल्यानंतर दुर्घटना घडली तर प्रवासी काहीच करू शकणार नाहीत.
राज्य परिवहन महामंडळातील सातारा मध्यवर्ती बसस्थानकात बुधवार, दि. १० रोजी पाच खासगी शिवशाही गाड्या अज्ञातांनी पेटविल्या. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. तेव्हा बसस्थानकात मोठी वर्दळ होती. मात्र अधिकारी, कर्मचारी, पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अनर्थ टळला. परंतु यातून सावध होऊन महामंडळाने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. बसस्थानकातील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी बंद अवस्थेतील संबंधित खासगी शिवशाही गाड्यांच्या ठेकेदारांना गाड्या इतर ठिकाणी घेऊन जाण्यास सांगितले. ठेकेदारांनीही साथ दिल्याने आता थोडी तरी मोकळी जागा मिळाली आहे.
चौकट
ग्रामीण गाड्यात अग्निशमन यंत्रणाच नाही
एसटी गाड्यांचे ठरावीक कालावधीनंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पासिंग केले जाते. अशावेळी गाड्यांमध्ये सर्वच आवश्यक त्या यंत्रणा ठेवलेल्या असतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांत अग्निशमन यंत्रणा ठेवलेली असते. मात्र ग्रामीण भागात मुक्कामाच्या ठिकाणी सुरक्षेची सुविधा नसल्याने चोरीला जाण्याच्या घटनांत वाढ होत असल्याने यंत्रणात ठेवलेली दिसत नाही.
चौकट
प्रथमोपचारपेटी नावाला
कोणतेही वाहन पासिंग करताना प्रथमोपचार पेटी असणे सक्तीचे आहे; पण अनेक गाड्यांमध्ये प्रथमोपचारपेटी नावालाच आहे. यामध्ये बॅन्डेट अन् कापूस ठेवलेला असतो; पण काही लागले तर प्रवासीही या सुविधेची मागणी करत नाहीत. ते परस्पर दवाखान्यात जाऊन उपचार घेतात.
चौकट
वायफाय ‘आऊट ऑफ रेंज’
एसटीत प्रवाशांसाठी सातत्याने नवनवीन सुविधा देण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. पण एसटीचं दुर्दैव असे की त्या फार काळ टिकत नाहीत. वायफायबाबतही तसेच झाले. सुरुवातीला त्यास प्रवाशांतूनही चांगला प्रतिसाद मिळाला. पण आता अनेक गाड्यांमध्ये यंत्रणाच दिसत नाही. ही यंत्रणा ‘ऑफट ऑफ रेंज’ तर झाली नाही ना, असा प्रश्न पडत असतो.
चौकट
प्रवाशांना रोखणार कोण?
सातारा मध्यवर्ती बसस्थानक हे जिल्ह्यातील सर्वात मोठे बसस्थानक आहे. या ठिकाणी खासगी सुरक्षा रक्षक नेमले आहेत; पण ते कोणालाही रोखत नाहीत. त्यांचे केवळ घडामोडींकडे बारकाईने लक्ष असते. ‘बसस्थानक हे सार्वजनिक ठिकाण आहे. येथे येण्यापासून कोणाला रोखू शकतो,’ असे त्यांचे म्हणणे आहे.
चौकट
हा तर स्मोकिंग झोन
‘बसस्थानक तसेच एसटीत धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे,’ या आशयाचे फलक लावलेले आहेत. मात्र असंख्य प्रवासी सिगारेट, बीडी ओढत असतात. त्यांच्यावर ना एसटी कर्मचारी कारवाई करतात ना पोलीस. त्यामुळे दुर्घटनांना निमंत्रण मिळत आहे.
कर्मचाऱ्यांना आगनियंत्रणाचे प्रशिक्षण
सातारा विभागातील दोन आगारात यापूर्वीच प्रशिक्षण दिले असून, लवकरच इतर ठिकाणीही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये स्वत:सोबतच मालमत्तेचे रक्षण करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- शेखर फरांदे
सुरक्षा व दक्षता अधिकारी, सातारा विभाग