‘जरंडेश्वर’च्या बगॅसला आग
By Admin | Published: May 27, 2015 11:09 PM2015-05-27T23:09:00+5:302015-05-28T01:01:30+5:30
दोन कोटींचे नुकसान : पॉकलेनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने घडली घटना
कोरेगाव : चिमणगाव, ता. कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्सच्या आवारातील बगॅस डेपोमध्ये असलेल्या पॉकलेनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने बुधवारी दुपारी अचानक आग लागली. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. शुगर मिल्ससह जिल्ह्यातील अग्निशामक दलांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीत सुमारे ११ हजार टन बगॅस जळाला असून, त्याची किंमत २ कोटी रुपये इतकी आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
कारखान्याच्या उत्तर दिशेला बगॅसचा मोठा डेपो आहे. या डेपोतून बुधवारी दुपारी बगॅस इतर वाहनांमध्ये पॉकलेनद्वारे भरण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानकच पॉकलेनमध्ये शॉर्टसर्किट झाले आणि त्याला आग लागली.
कारखाना व्यवस्थापनाने तातडीने जिल्ह्यातील किसन वीर व अजिंक्यतारा सहकारी कारखाना आणि सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब बोलावून घेतले. या बंबांनी युध्दपातळीवर प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. बगॅसच्या ढिगाऱ्यात खाली दहा फुटांपर्यंत आग धुमसत असल्याने ती आटोक्यात आणणे मुश्किल बनले होते. पॉकलेन हा खासगी ठेकेदाराच्या मालकाचा असून, त्याचे निश्चित किती नुकसान झाले, याची माहिती मिळू शकली नाही.
पोलीस कर्मचारी नीलेश येवले, महेंद्र पाटोळे व चालक आळंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा केला असून, त्यामध्ये सुमारे ११ हजार टन बगॅस जळाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. चालू बाजारभावाप्रमाणे जळालेल्या बगॅसची किंमत सुमारे २ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
ज्वलनशील पदार्थामुळे आग भडकली
बगॅस हा ज्वलनशील पदार्थ असल्याने क्षणार्धात डेपोला आगीने वेढले. आगीचे लोट आणि काळा धूर दिसू लागल्यानंतर कारखान्याच्या सुरक्षा विभागाने तातडीने अग्निशामक बंबाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र वाऱ्यामुळे आग पसरत गेली.