कलेढोण येथे आगीत जनावरांचा होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:36 AM2021-04-12T04:36:54+5:302021-04-12T04:36:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : कलेढोण, ता.खटाव येथील पश्चिम शेख मळ्यात शनिवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास गोठ्याला आग लागली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मायणी : कलेढोण, ता.खटाव येथील पश्चिम शेख मळ्यात शनिवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास गोठ्याला आग लागली. या आगीमध्ये जीवनावश्यक वस्तू, दोन दुचाकी जळाल्या, तसेच होरपळून काही जनावरांचा मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कलेढोण गावाच्या पश्चिम बाजूस रमजान शेख व आदम शेख या दोन बंधूंच्या घरासमोर असलेल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये शनिवारी रात्री दीडच्या दरम्यान मोठी आग लागली. गोठ्याला आग लागल्याची माहिती मिळताच, पोलीस पाटील सचिन शेटे यांनी घटनास्थळावर धाव घेतली, तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून शेख बंधूंच्या शेजारी राहणाऱ्या वस्तीवरील ग्रामस्थांना एकत्र करून गोठ्याच्या सभोवताली असलेल्या जनावरांच्या चाऱ्यांच्या गंजी हलवल्या, तसेच आग आटोक्यात आणून मोठा अनर्थ टाळला. मात्र, या आगीमध्ये जनावरांच्या गोठ्यात बांधलेल्या चार शेळ्या, म्हशीचे एक रेडकू, दोन दुचाकी, प्लास्टीक पाइप, विद्युत मोटारी, मका, ज्वारीची पोती, तसेच इतर जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले.
या घटनेची माहिती मिळताच, गाव कामगार तलाठी अभय शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ.वीरकर यांनी पाहणी करून पंचनामा केला.
फोटो ओळ : खटाव तालुक्यातील कलेढोण येथे गोट्याला लागलेल्या आगीत जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले, तसेच काही जनावरांचा मृत्यूही झाला. (छाया : संदीप कुंभार)