साताऱ्यात रेस्टॉरंटला भीषण आग, फर्निचर जळून खाक ; जीवितहानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 06:21 PM2019-05-21T18:21:52+5:302019-05-21T18:23:24+5:30
पोवई नाक्यावरील मरिआई कॉम्प्लेक्समधील दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या स्पाईसी कॉर्नर या रेस्टॉरंटला शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या हॉटेलमधील कामगार तिथे राहण्यास नसल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.
सातारा : पोवई नाक्यावरील मरिआई कॉम्प्लेक्समधील दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या स्पाईसी कॉर्नर या रेस्टॉरंटला शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या हॉटेलमधील कामगार तिथे राहण्यास नसल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोवई नाक्यावर असलेल्या मरिआई कॉम्प्लेक्समध्ये गेल्या काही वर्षांपासून स्पाईसी नावाचे रेस्टॉरंट सुरु आहे. शनिवारी पहाटे या रेस्टॉरंटला अचानक भीषण आग लागली. आगीचे आणि धुराचे लोट मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या लोकांच्या निदर्शनास आले.
याची माहिती त्यांनी तत्काळ सातारा शहर पोलीस व अग्निशमन दलाला दिली. पोलिसांनी व अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत हॉटेलमधील फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाले होते.
सुदैवाने ही आग लवकर आटोक्यात आणल्यामुळे बाजूला असणारी दुसरी दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली नाहीत. या हॉटेलमधील कामगार दुसरीकडे राहण्यास असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.