आग सोनगाव डेपात.. अन् धूर शेंद्रेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:35 AM2021-04-26T04:35:24+5:302021-04-26T04:35:24+5:30
सातारा/शेंद्रे : सातारा पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोत आग लागण्याच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. शनिवारी दुपारी डेपोतील कचऱ्याला आग ...
सातारा/शेंद्रे : सातारा पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोत आग लागण्याच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. शनिवारी दुपारी डेपोतील कचऱ्याला आग लागली. हवेमुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली. डेपोतून उसळणारे धुराचे लोट तब्बल दहा किलोमीटर परिघापर्यंत जाऊन पोहोचले. या धुुराचा सोनगाव, जकातवाडी, डबेवाडीसह अनेक गावांतील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागला.
सातारा पालिकेचा सोनगाव जवळ कचरा डेपो आहे. शहर व परिसरातून दररोज संकलित होणाऱ्या या कचऱ्याची या डेपोत विल्हेवाट लावली जाते. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, मिथेन वायूमुळे कचरा पेटण्याच्या घटना सातत्याने घडू लागतात. काही दिवसांपूर्वी डेपोत वणव्यामुळे मोठी आग लागली होती. ही आग कुठे आटोक्यात येतेय, तोवर शनिवारी दुसऱ्यांदा कचऱ्याला आग लागली.
डेपोतून निघणाऱ्या धुराचे प्रमाण इतके होते की, शेजारीच असणारा अजिंक्यताऱ्याचा डोंगरही दिसेनासा झाला होता, शिवाय शेंद्रे परिसरातही या धुराचे लोट पसरले. बोगदा-शेंद्रे हा रस्ता डेपोशेजारून गेल्याने याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. धुरामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तब्बल दहा किलोमीटर परिघापर्यंत धुराचे लोट पसरले. रविवारी दुसऱ्या दिवशीही परिस्थिती जैसे थे होती. त्यामुळे भल्या पहाटे जकातवाडी, सोनगाव, डबेवाडी, शेंद्रे, शहापूर येथील ग्रामस्थांना धुराचा त्रास सहन करावा लागला.
(कोट)
डेपोतील आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे साम्राज्य झाले आहे. या धुरामुळे स्थानिक ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. डेपोत सातत्याने आग लागत असून, नगरपालिकेने याची योग्य ती दखल घ्यावी, अन्यथा जकातवाडी ग्रामस्थ कचरा डेपोत कचरा टाकू देणार नाहीत.
- चंद्रकांत सणस, सरपंच (जकातवाडी)
(कोट)
शनिवारी लागलेली कचरा डेपोची आग रात्रभर सुरू होती. सातारा पालिका प्रशासनाने या प्रश्नावर कायमचा तोडगा काढावा, अन्यथा सोनगाव ग्रामस्थ नगरपालिकेचा कचरा डेपो कायमचा बंद करण्यासाठी मोठे जनआंदोलन उभारतील, याची नोंद घ्यावी.
- महेश नावडकर, ग्रामपंचायत सदस्य, सोनगाव.
फोटो : २५ सोनगाव डेपो
सातारा पालिकेच्या सोनगाव येथील कचरा डेपोत शनिवारी आग लागली. रविवारीही ही आग आटोक्यात न आल्याने सर्वत्र धुराचे लोट उसळत होते. (छाया : सागर नावडकर)