राष्ट्रीय महामार्गाकडेच्या वडाच्या झाडांना आग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:40 AM2021-03-17T04:40:44+5:302021-03-17T04:40:44+5:30
नागठाणे : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील काशीळ हद्दीत प्रमुख रस्ता आणि सेवारस्ता या दोन्ही रस्त्यांमधील एका मोठ्या वडाच्या झाडास मोठी ...
नागठाणे : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील काशीळ हद्दीत प्रमुख रस्ता आणि सेवारस्ता या दोन्ही रस्त्यांमधील एका मोठ्या वडाच्या झाडास मोठी आग लागली. यामुळे पर्यावरणप्रेमींतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
याबाबत माहिती अशी की, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कऱ्हाडकडून साताऱ्याकडे जाताना काशीळ हद्दीत प्रमुख रस्ता आणि सेवारस्ता या दोन्ही रस्त्यांमधील एका मोठ्या वडाच्या झाडास दुपारी बारा ते एकच्या सुमारास आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांकडून महामार्ग हेल्पलाईनचे प्रमुख दस्तगीर आगा यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनेची माहिती बोरगाव पोलीस ठाण्याला दिली.
घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीस आणि महामार्ग हेल्पलाईनचे कर्मचारी पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर हायवे हेल्पलाईनच्यावतीने एक आणि बोरगाव पोलीस स्टेशनकडून अजिंक्यतारा साखर कारखान्याकडून एक, असे दोन पाण्याचे बंब तत्काळ घटनास्थळी मागवून आग आटोक्यात आणण्यात आली.
आगीची तीव्रता खूप मोठी असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु लवकरात लवकर दोन्ही पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात आणण्यासाठी हायवे हेल्पलाईनचे दस्तगीर आगा तसेच नागठाणे येथील पिंटू शेठ, हायवे हेल्पलाईनचे सर्व कर्मचारी आणि बोरगाव पोलीस स्टेशनचे हवालदार देवकर, किरण निकम, संदीप मगरे, बी. आर. नदाफ यांनी मोलाचे सहकार्य दिले.
दरम्यान, सायंकाळी पाचच्या सुमारास बोरगाव हद्दीत राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर पुन्हा एका मोठ्या वडाच्या झाडास आग लागली असल्याची माहिती बोरगाव येथील स्थानिक व्यक्तींनी पिंटू शेठ नागठाणे यांना दिली. यावेळीही महामार्ग हेल्पलाईन आणि बोरगाव पोलिसांच्या मदतीने अजिंक्यतारा साखर कारखान्याचा अग्निशमन बंब आणि नागठाणे येथील पाण्याचा बंब तात्काळ बोलावून त्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. नागठाणे परिसरात दिवसभरात झालेल्या या दोन मोठ्या घटना असून यात कोणतीही जीवित हानी तसेच नुकसानी झाली नाही.