दिवाळीत उडाला फटाक्यांचा बार..प्रदूषणाची पातळी वाढली पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 02:23 PM2021-11-17T14:23:41+5:302021-11-17T14:23:51+5:30
सातारा : कोरोनाचा काळोख दूर करून आलेला दिवाळी सण सर्वत्र मोठ्या धामधुमीत साजरा करण्यात आला. यंदाच्या दिवाळीत अबालवृद्धांनी मनसोक्त ...
सातारा : कोरोनाचा काळोख दूर करून आलेला दिवाळी सण सर्वत्र मोठ्या धामधुमीत साजरा करण्यात आला. यंदाच्या दिवाळीत अबालवृद्धांनी मनसोक्त फटाके फोडून आनंद साजरा केला. मात्र, या फटाक्यांमुळे दिवाळीतील तीन दिवस प्रदूषणाची पातळी वाढल्याने श्वसनासह इतर आजारांतही वाढ झाली आहे.
फटाके फोडल्यानंतर मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते. या फटाक्यांमधून सल्फरडाय ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डायऑक्साइड आणि नायट्रेस बाहेर पडतात. हे घटक विषारी असतात जे हवेत धुलीकण स्वरूपात बराच काळ सक्रिय राहतात. सातारा जिल्ह्यात गेल्या वर्षी कोरोनामुळे फटाके फोडण्याचे प्रमाण नगण्य होते. त्यामुळे प्रदूषणाने देखील धोक्याची पातळी ओलांडली नव्हती. यंदा मात्र परिस्थिती बदलली. जिल्ह्यासह शहरात प्रचंड प्रमाणात फटाके फोडले गेले.
या फटाक्यांच्या धुरामुळे अस्थमा, श्वसनाचा आजार असणाऱ्या रुग्णांना सर्वाधिक त्रास झाला. तर, शिंका येणे, नाक गळणे, डोकेदुखी असे आजारही गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत. त्यामुुळे नागरिकांनी आरोग्याची योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.
आरोग्याची अशी घ्या काळजी
श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तातडीने रुग्णालयात जा. हवा दूषित असल्याने चष्मा व मास्कचा नियमित वापर करा. फटाक्यांमधील रसायनांमुळे डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे काही त्रास जाणवल्यास वेळेत उपचार घ्या. श्वसनविकार असलेल्या नागरिकांनी पहाटे व सायंकाळी मॉर्निंग वॉकला जावे. शारीरिक हालचाल करावी.
यंदा फटाक्यांची आतषबाजी
- जिल्ह्यासह सातारा शहरात यंदा सर्वाधिक फटाके फोडले गेले. गत वर्षी कोरोनामुळे दिवाळी सण उत्साहात साजरा करता आला नव्हता.
- ही उणीव नागरिकांनी यंदा भरून काढत लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीजेला फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली.
स्वत:ची अन् इतरांचीही काळजी घ्या
दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. यातून निघणारा धूर हा सर्वांसाठीच अपायकारक आहे. अस्थमाच्या रुग्णांनाच नव्हे, तर इतरांनाही या धुरामुळे श्वसनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोणताही त्रास झाल्यास अंगावर न काढता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत.- सुभाष चव्हाण, जिल्हा शल्याचिकित्सक
फटाक्यांचा धूर लहान मुले, वयोवृद्ध व श्वसनाचे आजार असलेल्यांना परिणामकारक ठरू शकतो. दूषित हवेमुळे न्यूमोनिया आणि क्षयरोगाच्या प्रमाणात वाढ होते. मधुमेहाच्या रुग्णांना याचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घ्यावी.- डॉ. योगिता शहा, सातारा