फटाका वाजला तरी वाटतंय झाला गोळीबार!--नागरिक तणावाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 07:58 PM2017-10-07T19:58:39+5:302017-10-07T20:04:00+5:30
सातारा : दिवाळी तोंडावर आली आहे. या परिस्थितीत कोजागिरीलाच शुक्रवारी मध्यरात्री बंदुकीतून फटाक...फटाक असे आवाज आले.
सातारा : दिवाळी तोंडावर आली आहे. या परिस्थितीत कोजागिरीलाच शुक्रवारी मध्यरात्री बंदुकीतून फटाक...फटाक असे आवाज आले. कोजागिरीमुळे चंद्राच्या साक्षीने दूध आटविण्यात लोक गुंतले असतानाच या आवाजाच्या दिशेने सर्वजण धावले. पाहतायत तर सुरुची बंगल्यासमोर पोलिसांसह लोकांची मोठी गर्दी झालेली. मात्र, बंदुकीच्या गोळीचा हा आवाज असल्याचे समजताच येथील सरळमार्गी लोक घरात जाऊन बसले. असे शुक्रवार पेठेतील नागरिक सांगत होते.
येथील नागरिकांशी चर्चा करत असताना ते तणावाखाली आहेत, हे जाणवत होतं. दिनक्रम सुरूच ठेवावा लागतो, त्यामुळे तणावाखाली असले तरी लोक त्यांच्या कामांत व्यस्त होते. सातारा शहरात नेहमीच रात्रीच्या वेळी फटाके फोडण्याची हौस काही मंडळी भागवत असतात. विशेषत: रात्री चौकात वाढदिवसाचा केक कापून फटाक्यांचा धडाका उडवून देण्याचा प्रकार साताºयात वारंवार सुरू असतो. मात्र, शुक्रवार पेठेत अनेक दिवसांपासून असले प्रकार बंद झाल्याचे नागरिक सांगतात.
लोक नाव न घेण्याच्या अटीवर प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलते झाले. तणाव आहे पण तो दाखवून न देण्याचे कसब या नागरिकांनी बाळगले आहे. ‘मुलांच्या परीक्षा सुरू आहेत आणि दवाखान्यात आपल्या नातलगाला जेवणाचा डबा द्यायचा आहे,’ अशा अनेक दैनंदिन गोष्टी करायच्या असतात. मात्र, कोजागिरी पोर्णिमेच्या रात्री घडलेल्या घटनेनंतर सुरुची बंगल्यापासून मोती तळ्यापर्यंत तसेच गोराराम मंदिरापर्यंत रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून, पोलिसांनी संचारबंदी केलेली आहे. तणाव काहीच नाही. तरीही पोलिसांनी हे रस्ते बंद केलेत, असं या नागरिकांचे म्हणणे आहे. शुक्रवार पेठेतून अनंत इंग्लिश स्कूल अथवा मंगळवार तळे, राजवाडा मंडईत जायचे झाले तरी वाहन नेता येत नाही. त्यामुळे त्याठिकाणी चालतच जावे लागत आहे.
जागोजागी पोलिस अडवत असल्याने स्थानिक नागरिकांची भलतीच कोंडी झालेली आहे.
दिवाळी सुखरूप साजरी होणार का? या प्रश्नावर ‘जो तो आपल्या कुवतीप्रमाणे ती साजरी करत असतो. कर्ज काढू पण दिवाळी साजरी करू, अशी मानसिकता असते. त्यामुळे दिवाळी तर साजरी होणारच आणि फटाकेही फुटणार,’असे एका नागरिकाने सांगितले.
दिवाळीची बंदूक आहे...
शुक्रवार पेठेतील रस्त्यावर कोजागिरीदिवशी बंदुकीचे बार वाजले होते. आता दिवाळीत फटाके फोडण्यासाठी एक छोटा खेळण्यातील बंदूक घेऊन जाताना पाहायला मिळाला.