फटाके स्टॉलधारकांनी जाणली स्वच्छतेची शिस्त
By admin | Published: October 26, 2014 09:18 PM2014-10-26T21:18:12+5:302014-10-26T23:26:37+5:30
मैदान सोडताना दिसली स्वच्छता : आठ दिवसांत झाली कोट्यवधी रुपयांची उलाढाल
सातारा : सैनिकी शिस्त म्हणजे नेमके काय असते, याचा अनुभव सातारा शहर आणि परिसरातील फटाके स्टॉलवाल्यांनी यावर्षी घेतला. कधी नव्हे ते त्यांनी लष्करी शिस्तीचा अनुभव घेतल्यामुळे मैदान सोडताना त्यांना स्वच्छतेला प्राधान्य देऊनच मैदान सोडावे लागले. दीपावलीत सातारा शहरात दरवर्षी शंभर ते दीडशेच्या आसपास फटाका स्टॉल लागतात. काही वर्षांपूर्वी हे स्टॉल राजपथावर लावले जायचे. मात्र, पाच वर्षांपूर्वी येथे शॉर्टसर्किटने आग लागल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यानंतर येथे स्टॉल उभारणीस परवानगी द्यावी की नको, यावरही चर्चा रंगली. पालिका आणि स्टॉलधारकांमध्ये शाब्दिक वादावादीचे प्रसंगही उद्भवले. यानंतर राजपथावर स्टॉल उभारणीस मनाई करण्यात आली. यानंतर फटाके स्टॉल जिल्हा परिषदेच्या मैदानावर उभारणीस प्रारंभ झाला. काही वर्षे येथे फटाके स्टॉल उभारणी करण्यात येत होती. मात्र, येथे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि कागदी कचरा मोठ्या प्रमाणात साचू लागला. फटाके स्टॉलवालेही तसेच कचरा टाकून जाऊ लागल्याने आणि जिल्हा परिषदेनेही मैदान सफाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही दिवस कचरा तसाच पडून राहू लागला. यावर काही सामाजिक संस्थांनी आवाज उठविल्यानंतर कचरा बाजूला केला आणि यापुढील काळात मैदान फटाके स्टॉलवाल्यांना न देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. मात्र, जवळपास सव्वाशे ते दीडशे फटाके स्टॉल लागत असल्यामुळे येथे कागदी कचराही मोठ्या प्रमाणात जाणवतो. मात्र, यावेळी फटाका स्टॉल सैनिक स्कूलच्या मैदानावर असल्यामुळे सर्व प्रक्रिया शिस्तीत पार पडली आहे.
रविवारी फटाका स्टॉल काढण्याचे काम वेगाने सुरू होते. यावेळी कोठेही कचरा दिसून आला नाही. (प्रतिनिधी)
फटाका कचऱ्याची समस्या मोठी
सातारा शहरात सुरुवातीच्या काळात फटाके स्टॉलची उभारणी राजवाड्यावरील गांधी मैदानावर व्हायची. मात्र, स्टॉलधारकांची संख्या वाढू लागल्यामुळे स्टॉल उभारणी तालीम संघाच्या मैदानावरही केली जायची. मात्र, दीपावली संपल्यानंतर आणि स्टॉल काढून घेतल्यानंतर येथे कचरा साचला जायचा. त्याचा त्रास पैलवान तसेच नागरिकांना होऊ लागल्यामुळे त्यांनीही विरोध केला. यानंतर हेच स्टॉल राजपथावर आले. मात्र, येथेही स्टॉलधारकांचा पिछा न सुटल्यामुळे त्यांना जिल्हा परिषद आणि त्यानंतर आता सैनिक स्कूलच्या मैदानावर फटाके स्टॉलची उभारणी केली जाऊ लागली.
वर्षभराचे उत्पन्न आठच दिवसांत
सातारा शहरात जवळपास दीडशेच्या आसपास स्टॉल लावले जातात. यामध्ये व्यापारी तर असतातच त्याचबरोबर काही युवक मंडळी एकत्रित येऊन स्टॉल उभारणी करतात. यातून चांगले उत्पन्न मिळते.
सातारा शहरातील अनेक मंडळींचा फटाके स्टॉल उभारणीकडे कल वाढू लागला आहे. कारण आठ दिवसांत वर्षभराचे उत्पन्न मिळत असल्यामुळे अनेकजण फटाके स्टॉल उभारणीला प्राधान्य देतात. यासाठी आवश्यक असणारे परवाने काढण्यासाठीही चढाओढ असते.
आठ दिवसांत वर्षभर पुरेल इतके उत्पन्न मिळत असल्यामुळे फटाके स्टॉल उभारणीला प्राधान्य देण्यात ही मंडळी आघाडीवर असते.