दवाखाना बंद पाहून तरुणाकडून गोळीबार, साताऱ्यातील घटना

By दत्ता यादव | Published: June 25, 2023 08:34 PM2023-06-25T20:34:57+5:302023-06-25T20:35:05+5:30

 जखमी मैत्रिणीच्या हातावर करायचे होते उपचार

firing in satara city in front of closed hospital | दवाखाना बंद पाहून तरुणाकडून गोळीबार, साताऱ्यातील घटना

दवाखाना बंद पाहून तरुणाकडून गोळीबार, साताऱ्यातील घटना

googlenewsNext

सातारा : मैत्रिणीच्या हाताला जखम झाल्याने तिला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, क्लिनिक बंद असल्याचे पाहून संतप्त झालेल्या तरुणाने जमिनीवर एक गोळी झाडली. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. ही धक्कादायक घटना साताऱ्यातील कोडोली परिसरात रविवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे.

नेताजी बोकेफोडे उर्फ बंड्या (वय २३, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नेताजी बोकेफोडे याच्या मैत्रिणीच्या हाताला जखम झाल्याने तिला स्कूटीवरून त्याने कोडोलीतील समर्थनगरमध्ये असलेल्या गणेश क्लिनिक येथे नेले होते. मात्र, रविवारी क्लिनिकला सुटी असल्याने दवाखाना बंद होता. हे पाहून क्लिनिकच्या समोरच त्याने खिशातून पिस्तूल काढून जमिनीवर गोळी झाडली.

गोळीबाराच्या आवाजाने आजूबाजूचे लोक तेथे धावत आले. त्यानंतर तो मैत्रिणीला घेऊन तेथून निघून गेला. या प्रकाराची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या गोळीबारात कोणी जखमी झाले नसले तरी दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने कोडोली परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे गतीने फिरवून तासाभरातच नेताजी बोकेफोडे याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून जर्मन बनावटीचे पिस्तूल पोलिसांनी जप्त केले. हे पिस्तूल त्याने कोणाकडून आणले होते. याचा पोलिस तपास करीत आहेत.

म्हणे, चुकून गोळी झाडली...

पोलिसांनी नेताजी बोकेफोडेला ताब्यात घेतल्यानंतर त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडून चुकून गोळी झाडली गेली, असे तो पोलिसांना सांगत आहे. परंतु बंदूक परवाना नसताना त्याने हे शस्त्र बाळगल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.

जमिनीवर पडला खड्डा

नेताजीने पिस्तूल लोड करून जमिनीवर गोळी झाडली. डांबरी रस्त्यावर गोळी झाडल्याने छोटा खड्डा पडला. तर शेजारी बंदुकीची पुंगळी पडलेली पोलिसांना आढळून आली. मैत्रिणीसमोर प्रभाव पाडण्यासाठी त्याने अशाप्रकारचा प्रकार केल्याचे पोलिस सांगतायत.

Web Title: firing in satara city in front of closed hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.