Satara Crime: वैयक्तिक वादातून ठाण्याच्या माजी नगरसेवकाचा गोळीबार, दोन ठार; पाटण तालुक्यात खळबळ
By जगदीश कोष्टी | Updated: March 20, 2023 12:51 IST2023-03-20T11:36:23+5:302023-03-20T12:51:53+5:30
गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळीच थांबला होता

Satara Crime: वैयक्तिक वादातून ठाण्याच्या माजी नगरसेवकाचा गोळीबार, दोन ठार; पाटण तालुक्यात खळबळ
कोयनानगर/पाटण : पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील गुरेघर धरण परिसरात रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. ठाण्याच्या माजी नगरसेवक मदन कदम याने वैयक्तिक वादातून हा गोळाबार केल्याची चर्चा आहे.
श्रीरंग जाधव (वय ४५), सतीश सावंत (३०) अशी गोळीबारात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर प्रकाश जाधव (४२, तिघे रा. कोरडेवाडी, ता. पाटण ) हे जखमी झाले आहेत. जखमीला कराडला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. ही माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गोळाबार करणाऱ्या संशयित कदम यास पिस्तुलासह ताब्यात घेतले आहे.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मोरणा विभागातील गुरेघर परिसरात राहणाऱ्या दोघांमध्ये वैयक्तिक कारणातून वाद होता. या वादातूनच चार दिवसांपूर्वी त्यांच्यात वादावादी झाल्याचीही चर्चा आहे. या वादावादीबाबत पोलिस ठाण्यातही तक्रारी करण्यात आल्या होत्या, असे सांगण्यात येते.
त्यानंतर रविवारी रात्री गावातील काहीजण जाब विचारण्यासाठी गेले तेव्हा मदन कदम याने गोळीबार केला. यामध्ये श्रीरंग जाधव आणि सतीश सावंत यांचा मृत्यू झाला तर प्रकाश जाधव जखमी झाले. ग्रामस्थांना काही समजण्यापूर्वीच गोळ्या झाडल्याचा आवाज आल्यामुळे ग्रामस्थांची धावपळ उडाली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाटण पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने रवाना झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलिस त्याठिकाणी थांबून होते. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळीच थांबला होता, असे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी मदन कदम याला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पिस्तूल जप्त केली आहे.