पलूसमध्ये गोळीबार; माय-लेकी जखमी
By admin | Published: July 25, 2016 12:40 AM2016-07-25T00:40:28+5:302016-07-25T00:40:28+5:30
भरदिवसा थरार : कौटुंबिक वादातून दिराचे कृत्य; सासऱ्याची चिथावणी; दोन पुंगळ्या सापडल्या
सांगली / पलूस : पलूस येथील कुंडल वेसमध्ये रविवारी दुपारी दोन वाजता दिराने कौटुंबिक वादातून भावजय व पुतणीवर गोळीबार केला. सासऱ्याने ‘घाल गोळ्या, मारून टाक’, अशी चिथावणी दिल्याने त्याने हे कृत्य केले. सुषमा सुनील हुबाळे (वय ३०) व सानिका सुनील हुबाळे (११) या दोघी गोळीबारात जखमी झाल्या आहेत. घटनेनंतर सासरा मारुती हुबाळे व दीर शशिकांत ऊर्फ बाब्या हुबाळे (दोघे, रा. कोटभाग, वाळवा) यांनी पलायन केले; पण नागरिकांनी पाठलाग करून सासऱ्याला पकडले.
जखमी सुषमा व सानिका या माय-लेकीवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळी दोघींच्या डाव्या पायाला लागली आहे. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केल्याने त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक वैशाली शिंदे यांच्या पथकाने रुग्णालयात भेट देऊन सुषमा यांचा जबाब नोंदवून घेतला. रात्री उशिरापर्यंत पलूस पोलिस ठाण्यात सासरा मारुती व दीर शशिकांत या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पलूसमध्ये भरदिवसा गोळीबार झाल्याचे वृत्त समजताच नागरिकांनी सुषमा यांच्या माहेरील कुंडलवेस घरासमोर मोठी गर्दी केली होती. पलूस पोलिसांनी पंचनामा केला. त्यावेळी त्यांना दोन पुंगळ्या सापडल्या आहेत. त्या जप्त करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्या आहेत. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी याची गंभीर दखल घेऊन संशयितांचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पलूस पोलिस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची दोन पथके शोधासाठी विविध भागात रवाना करण्यात आली आहेत.
सुषमा यांचा विवाह २००४ मध्ये वाळवा येथील सुनील हुबाळे याच्याशी झाला आहे. त्यांना पार्थ (वय ९ वर्षे) व सानिका (११) ही दोन मुले आहेत. सुनील हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध दरोडा, जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे नोंद आहेत. गेल्या काही वर्षांपासून तो चोरीच्या गुन्ह्यात कारागृहात आहे. त्यामुळे सुषमा गेल्या वर्षभरापासून दोन मुलांना घेऊन माहेरी राहते. ती अंगणवाडी शिक्षिका आहे. चार महिन्यांपूर्वी सासरा मारुती हुबाले याने नात सानिकाला वाळव्याला नेले होते. सुषमा हिने तिला शाळेला पलूसमध्ये घातले होते. त्यामुळे गेल्या महिन्यात तिने सानिकाला पुन्हा पलूसला आणले होते. सासऱ्याची सानिकाला पाठविण्याची इच्छा नव्हती. यातून तिचा सासऱ्याशी वादही झाला होता.
रविवारी दुपारी मारुती हुबाळे हा त्याचा मित्र पोपट जाधव यास घेऊन सानिकाला नेण्यासाठी पलूसला आला होता. त्याने सुषमाची भेट घेऊन सानिकाला घेऊन जाणार असल्याचे सांगितले. यातून त्यांच्यात वाद झाला. मारुती सुषमा यांच्या अंगावर धाऊन गेला. त्यांच्यात झटापट झाली. हा प्रकार पाहून मित्र पोपट जाधव हा तेथून पळून गेला. सुषमा मारुतीच्या तावडीतून घराबाहेर आली. तिने घराला बाहेरून कडी लावली. आत मारुती व सानिका दोघेच होते. सुषमाने सामाजिक कार्यकर्त्या वासंती मेरू यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याची विनंती केली. दुसरीकडे मारुती दरवाजा आतून ठोठावत दार उघडण्यासाठी हाक देत होता; पण बाहेरून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्याने मुलगा शशिकांत ऊर्फ बाब्या याच्याशी संपर्क साधला.
शशिकांत हा काही वेळातच सुषमाच्या घराजवळ आला. सुषमाला पाहून त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिचे केस धरून फरफटत घराजवळ नेले. घराची कडी काढून वडील मारुती यांची सुटका केली. त्यानंतर मारुती व शशिकांतने सुषमाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारुतीने ‘बाब्या, बघतोस काय, मारून टाक तिला’ अशी चिथावणी दिली. त्यामुळे संतापलेल्या शशिकांतने कमरेला लावलेले रिव्हॉल्व्हर काढून सुषमा तसेच सानिकावर गोळीबार केला. यामध्ये दोघींच्या डाव्या पायाला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाल्या. गोळीबाराच्या आवाजाने परिसर हादरल्याने नागरिक धावत आले. तोपर्यंत मारुती व शशिकांत तेथून पसार झाले. नागरिकांनी सुषमा व सानिकाला उपचारासाठी हलविले.
जिल्ह्यात नाकाबंदी
शशिकांत दुचाकीवरून हेल्मेट घालून आला होता. त्याने सुषमा व सानिकावर जवळून गोळ्या घातल्या. तो दुचाकीवरून पसार झाल्याचे समजताच त्याला पकडण्यासाठी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी नाकाबंदी करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर नाकाबंदी केली होती. संशयित वाहने थांबवून त्यामधील लोकांची चौकशी पोलिस करीत होते. पण, शशिकांतचा सुगावा लागला नाही.
चारित्र्याचा संशय; शैक्षणिक खर्चाचा वाद!
सुषमाचा पती कारागृहात आहे. गेल्या वर्षभरापासून ती माहेरी राहत असल्याने सासरा मारुती व दीर शशिकांत हे दोघे सुषमाच्या चारित्र्यावर संशय घेत होते. तसेच सुषमाच्या बी.कॉम.च्या शिक्षणाचा खर्च त्यांनी केला होता. खर्चाची ही रक्कम तिने परत करावी, अशी ते मागणी करीत होते. याशिवाय सानिकाला पाठविण्यास सुषमाचा विरोध होता. या तीन कारणांवरून ही घटना घडली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. पण, सुषमा काय जबाब देते, त्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
सासऱ्याला बेदम चोपले
गोळीबाराचा आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी सुषमाच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी सासरा मारुती व दीर शशिकांत पळून जात होते. नागरिकांनी पाठलाग करून सासऱ्याला पकडले व बेदम चोप दिला. त्यानंतर पलूस पोलिसांच्या ताब्यात दिले. पण शशिकांतला पकडण्यात यश आले नाही.