विज्ञान प्रदर्शनात सलग १२ वर्षे प्रथम
By admin | Published: December 6, 2015 10:56 PM2015-12-06T22:56:12+5:302015-12-07T00:25:04+5:30
खंडाळा तालुका : कर्नवडीतील शिक्षकांची चौथी हॅट्ट्रिक
खंडाळा : खडाळा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कर्नवडी येथील प्राथमिक शाळेचे उपशिक्षक प्रकाश जाधव यांच्या संख्याज्ञान व गणितीय क्रियादर्शक या शैक्षणिक साधनास प्रथम क्रमांक मिळाला. या साधनाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, विज्ञान प्रदर्शनात शिक्षक गटातून सलग १२ वर्षे प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्यावर जाण्याची चौथी हॅट्ट्रिक साधण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे.खंडाळा तालुक्याचे विज्ञान प्रदर्शन ज्ञानसंबोधिनी हायस्कूलमध्ये भरविण्यात आले होते. यामध्ये शैक्षणिक अध्यापननिर्मिती गटामध्ये प्रकाश जाधव यांनी संख्याज्ञान व गणितीय क्रीयादर्शक या साहित्यातून सुलभरीत्या गणिती क्रिया कशा करता येतात, हे दाखवून दिले. प्राथमिक स्तरावरील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना हे साधन नवी दिशा ठरले आहे. या साधनाची निवड जिल्हास्तरासाठी करण्यात आली आहे. दरवर्षी विज्ञान प्रदर्शनात नवनवीन संकल्पना निवडून प्रकाश जाधव यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांनी सलग १२ वेळा प्रथम क्रमांक मिळवून वेगळा विक्रम केला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल सभापती रमेश धायगुडे-पाटील, गटविकास अधिकारी विलासराव साबळे, गटशिक्षणाधिकारी अलका मुळीक, विस्ताराधिकारी गजानन आडे, सचिव रमेश देशपांडे, केंद्रप्रमुख विमल नेवसे, कर्नवडीचे सरपंच रेखा कांबळे, उपसरपंच सुरेश जाधव, शाळा कमिटी अध्यक्ष विठ्ठलराव दुधाणे, मुख्याध्यापक संपत चौधरी तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थांनी सत्कार केला. (प्रतिनिधी)