‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 

By नितीन काळेल | Published: October 9, 2024 08:38 PM2024-10-09T20:38:41+5:302024-10-09T20:39:17+5:30

आठही मतदारसंघ लढवणार : साताऱ्यात ५८ उमेदवारांच्या मुलाखती पार.

First candidate of vba announced in the district Imtiaz Nadaf in Mann  | ‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 

‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी सात मतदारसंघासाठी ५८ इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. तर वंचितचा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवारही माणमधून जाहीर झाला आहे. पक्षाने इम्तीयाज नदाफ यांना उमेदवारी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी वंचितच्यावतीने राज्यभर इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. बुधवारी शासकीय विश्रामगृहात सातारा जिल्ह्यातील सात मतदारसंघासाठी निरीक्षक प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी ५८ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये सातारा मतदारसंघासाठी १३, वाई ७, कऱ्हाड उत्तर ९, कऱ्हाड दक्षिण ६, पाटण ५, फलटण १२, कोरेगाव मतदारसंघासाठी ६ जणांच्या मुलाखती झाल्या. वंचितकडून अनेक दिग्गजांनी उमेदवारी मागितली असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, महासचिव गणेश भिसे, पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष भीमराव घोरपडे, महासचिव अरविंद आढाव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

वंचितचे १० उमेदवार जाहीर...
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी राज्यातील १० विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील माण मतदारसंघाच्या उमेदवाराचा समावेश आहे. माणमध्ये इम्तीयाज जाफर नदाफ यांना उमेदवारी मिळाली आहे. जिल्ह्यातील उर्वरित विधानसभा मतदारसंघातील उमेदवारही लवकरच जाहीर होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.
 

Web Title: First candidate of vba announced in the district Imtiaz Nadaf in Mann 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.