पहिल्या बहराची स्ट्रॉबेरी बाजारात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 11:24 PM2018-11-26T23:24:36+5:302018-11-26T23:24:40+5:30
पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देणारी पहिल्या बहराची स्ट्रॉबेरी बाजारात दाखल झाली आहे. महाबळेश्वर तालुका स्ट्रॉबेरी हब ...
पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देणारी पहिल्या बहराची स्ट्रॉबेरी बाजारात दाखल झाली आहे. महाबळेश्वर तालुका स्ट्रॉबेरी हब म्हणून देश-विदेशात ओळखला जातो. देशाच्या एकूण स्ट्रॉबेरी उत्पन्नात महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचा ८५ टक्के वाटा आहे. तालुक्यात साडेतीन हजार एकर क्षेत्रांवर स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले आहे.
भिलारे, कासवंड, मेटगुताड, अवकाळी, भोसे, दानवली, पांगरी, तायघट, पाचगणी तसेच कमी-अधिक प्रमाणात दांडेघर, गोडवली, खिंगर या ठिकाणचे शेतकरीही मुख्यत: स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेत आहेत. स्ट्रॉबेरी हंगामाची सुरुवात आॅक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये होते. यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे मदर प्लांट रोपांना कमकुवतपणा, रनर उशिरा आल्याने लागवड लांबणीवर गेली. त्यामुळे स्ट्रॉबेरी बाजारात उशिरा येणार होती. मदर प्लांटची रोपे परदेशातून मे-जूनच्या मध्यावर आयात केली जाते. त्यापासून पुन्हा रोपनिर्मिती केली जाते. त्यापासून तयार झालेले रनर प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून रोपं तयार करून घेतली जातात. त्याची लागवड सप्टेंबरमध्ये केली जाते तर टिश्यू व कल्चर पद्धतीचं रोपं स्ट्रॉबेरीच्या बियांपासून एकदाच तयार करून ते सरळ लागवडीसाठी कॅलिफोर्नियामधून आॅगस्टमध्ये उपलब्ध केली जाते. त्याला फळेही एक महिना अगोदर म्हणजे आॅक्टोबरमध्ये येतात. मदर प्लांट रोपांची लागवड सप्टेंबरमध्ये केल्याने नोव्हेंबरमध्ये फळे येतात.
अलीकडे टिश्यू व कल्चर पद्धतीच्या रोपांना जास्त पसंती दिली जात आहे. नवीन रोपे तयार करण्यासाठी वाई, जावळी या ठिकाणी शेती खंडाने द्यावी लागते. मजुरी, औषध खर्च एवढं सर्व करून हवामानाने साथ दिली नाही तर रोपांवर रोग पडणे तसेच रोपे कोमेजणे अशा नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. तसेच टिश्यू व कल्चर पद्धतीमुळे सरळ लागवड व एक महिन्यात अगोदर उत्पन्न घेता येत असल्याने यावर्षी टिश्यू व कल्चरच्या रोपांमुळे आॅक्टोबरच्या मध्यावरच स्ट्रॉबेरी बाजारात दाखल झाले. बाजारात अडीचशे ते तीनशे रुपये किलो दर सुरू आहे, त्यामुळे पहिल्या बहराची स्ट्रॉबेरी उत्पादन घेणाºयास चांगला आर्थिक फायदा होतो. मदर प्लांट रोपांची लागण झालेल्या रोपांच्या अगोदर स्ट्रॉबेरी फळ बाजारात उपलब्ध होतात.
लालचुटूकची पर्यटकांना भुरळ
सध्या स्ट्रॉबेरीचा भाव भलताच वाढला आहे. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकºयांकडून व्यावसायिक अडीचशे ते तीनशे रुपये किलो दराने खरेदी करून पर्यटकांना पाचशे ते सहाशे रुपये किलो दराने त्याची विक्री करत आहेत. त्यामुळे पर्यटकांमधून स्ट्रॉबेरीला जास्त पसंती मिळत आहे. फिरायला येणाºयांना महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी भुरळ पाडत आहे.