पहिला झाला.. दुसरा झाला.. आता तिसरा डोस कसला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 12:55 PM2021-06-06T12:55:58+5:302021-06-06T13:02:08+5:30
Corona vaccine Virus Satara : कोरोना होऊ नये म्हणून शासनातर्फे लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. लसीचे दोन डोस घेऊन देखील नागरिकांच्या मोबाईलवर डोस घेण्याबाबतचे संदेश येत असल्याने पहिला झाला.. दुसरा झाला.. आता तिसरा डोस कसला ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
सागर गुजर
सातारा : कोरोना होऊ नये म्हणून शासनातर्फे लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. लसीचे दोन डोस घेऊन देखील नागरिकांच्या मोबाईलवर डोस घेण्याबाबतचे संदेश येत असल्याने पहिला झाला.. दुसरा झाला.. आता तिसरा डोस कसला ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
लसीकरणाच्या बाबतीमध्ये सावळागोंधळ सुरुवातीपासूनच सुरू होता, तो अजून देखील सुरूच आहे. ग्रामीण भागामध्ये लसीकरण मोहीम शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडते आहे; परंतु शहरांमध्ये मात्र लसीकरण केंद्रांवर पहाटे पासून बसणाऱ्या नागरिकांना लस मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
दरम्यान, सातारा पालिकेचे माजी नियोजन सभापती रवींद्र झुटिंग यांना लसीकरणाच्या बाबतीतला एक वेगळाच अनुभव येत आहे. त्यांनी ६ मार्च २०२१ ला नोंद करून लसीचा पहिला डोस घेतला, त्यानंतर ४५ दिवसानंतर त्यांनी २१ एप्रिल रोजी नोंदणी करून दुसरा डोस घेतला. दोन्ही डोसचे प्रमाणपत्र देखील त्यांनी घेतले. मात्र पुन्हा २६ मे रोजी दुसरा डोस हा २९ मे रोजी असल्याचा संदेश आला. तसेच त्यांच्या मोबाईलवर ओटीपी देखील पाठवून देण्यात आला होता.
रविंद्र यांनी पहिले दोन्ही डोस घेतले असल्याने या संदेशाकडे दुर्लक्ष केले, परंतु पुन्हा एक जूनला त्यांना तसाच संदेश आला. या संदेशात देखील ओटीपी देण्यात आला होता. त्यामुळे त्यांना प्रश्न पडला डोस घेतलेले असतानादेखील वेबसाईटवर नोंद केली असल्याने वारंवार संदेश पाठवले जात आहेत आणि त्यात ओटीपी देखील दिला जातोय, हे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनी या संदेशाकडे दुर्लक्ष केले.
लोकांचा मोबाईल नंबर संबंधीत वेबसाईटकडे आहे. एखाद्या व्यक्तीने दोन्ही डोस घेतले असतील मात्र त्याचे प्रमाणपत्र घेतले नसेल तर असा मेसेज आल्यास लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होते तसेच सध्याच्या परिस्थितीत लोकांचे चिंतेत देखील भर पडते. लोक लस घेण्यासाठी पुन्हा लसीकरण केंद्रावर जातील, किंवा हा ओटीपी शेअर झाला तर लोकांच्या बँकेतील पैशावर देखील डल्ला मारला जाऊ शकतो, अशी शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे.
ओटीपी देणं धोकादायक ठरेल...
मोबाईलवर ओटीपी पाठवून फसवणुकीचे गुन्हे होत असतात. लसीकरणासाठी जी वेबसाईट दिली आहे, त्यांच्यामार्फत असे ओटीपी नागरिकांच्या मोबाईलवर पाठवले जात आहेत. दोन्ही डोस घेऊन देखील ओटीपी आला आणि असा ओटीपी चुकीच्या ठिकाणी वापरला गेला तर लोकांच्या आर्थिक नुकसान देखील होऊ शकते आणि हे धोकादायक आहे.
मी कोविशील्डचे दोन्ही डोस घेतले. यासाठी रीतसर शासनाने दिलेल्या वेबसाईटवर नोंद केली होती. लसीकरणानंतर त्याचे प्रमाणपत्र देखील घेतले. मात्र अजूनही लस घेण्यासंदर्भाने संदेश येत आहेत. त्यामध्ये ओटीपी दिला जातोय, ही बाब शंकास्पद आहे.
- रवींद्र उर्फ शैलेंद्र झुटिंग- भारती
माजी नियोजन सभापती, सातारा.