आधी बेडची खात्री मगच ॲम्बुलन्स दारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:48 AM2021-04-30T04:48:21+5:302021-04-30T04:48:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाची परिस्थिती सध्या प्रशासनाच्या हाताबाहेर गेली असून, सातारा शहरामध्येही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक ...

First make sure of the bed, then the ambulance door! | आधी बेडची खात्री मगच ॲम्बुलन्स दारी!

आधी बेडची खात्री मगच ॲम्बुलन्स दारी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाची परिस्थिती सध्या प्रशासनाच्या हाताबाहेर गेली असून, सातारा शहरामध्येही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळेनासे झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी रुग्णवाहिकेला बेड मिळण्यासाठी हॉस्पिटलच्या दारोदारी फिरावे लागत होते. मात्र आता ही परिस्थिती बदलली असून, १०८ रुग्णवाहिकेच्या व्यवस्थापनाने ज्या नातेवाइकांनी बेडची खात्री केली आहे अशाच नातेवाइकांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

गत दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, तर यापैकी सातारा शहरामध्ये सध्या सहा हजार कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेकजण रुग्णालयात जाण्यासाठी धावाधाव करत आहेत. अशावेळी रुग्णवाहिकेला घरी बोलावून हॉस्पिटलमध्ये जात आहेत. मात्र हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने पुन्हा रुग्णासह रुग्णवाहिका दुसरे हॉस्पिटलला जात होती, असे आठ-दहा हॉस्पिटल रोज रुग्णवाहिकेला पालथी घालावी लागत लागत होती. मात्र यावर उपाय म्हणून १०८ रुग्णवाहिकेच्या व्यवस्थापनाने अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे. बेडची खात्री केल्यानंतरच ही रुग्णवाहिका रुग्णांसाठी उपलब्ध होत आहे. त्यामुळे विनाकारण रुग्णवाहिका ही हॉस्पिटलच्या दारोदारी फिरायची बंद झाली. अत्यंत इमर्जन्सी असेल तर खात्री पटल्यानंतरच बेड नसतानाही रुग्णवाहिका रुग्णाच्या घरी जात आहे.

कोट: पूर्वी दिवसभरात आठ ठिकाणी तरी जावे लागत होते. मात्र १०८ रुग्णवाहिकेच्या व्यवस्थापनाने यावर तोडगा काढला असून, जर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला असेल तरच खात्री करून रुग्णवाहिका नेली जात आहे. त्यामुळे सध्या तरी फारसे फिरावे लागत नाही.

राजेंद्र कदम, जिल्हा व्यवस्थापक, वैद्यकीय आपत्कालीन

कोट: दोन महिन्यांपूर्वी आम्ही रुग्ण घेऊन बऱ्याच हॉस्पिटलमध्ये जात होतो. साधारण दिवसाला सहा ते सात हॉस्पिटलला आमच्या वाऱ्या व्हायच्या. तेव्हा कुठे रुग्णाला बेड मिळत होता. पण आता ही परिस्थिती बदललेली आहे.

मनोज देवकर, चालक

कोट : अनेक रुग्णांचे नातेवाईक बेड हॉस्पिटलला न पाहताच आम्हाला फोन करत असतात. त्यावेळी नाइलाज असतो. आम्हालाही जावे लागते. तेव्हा हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला नाही तर हॉस्पिटलच्या बाहेर बराच वेळ आम्हाला ताटकळत उभे राहावे लागते. यासाठी आम्ही आता बेडची खात्री केल्याशिवाय जात नाही.

रामचंद्र कदम, चालक

Web Title: First make sure of the bed, then the ambulance door!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.