पहिले शहीद अपशिंगेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:19 PM2018-08-14T23:19:55+5:302018-08-14T23:20:17+5:30

The first martyr | पहिले शहीद अपशिंगेचे

पहिले शहीद अपशिंगेचे

Next

प्रगती जाधव- पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील २५४ जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. सातारा तालुक्यातील अपशिंगे या गावातील मुगुटराव भोसले यांना १५ मार्च १९४१ रोजी देशसेवा बजावताना वीरमरण आहे. देशासाठी हुतात्मा झालेले ते पहिले सातारकर आहेत.
सातारा जिल्ह्याला शूरांची मोठी परंपरा आहे. सातारा तालुक्यातील अपशिंगे या गावात प्रत्येक घरात एक सैनिक जन्माला येतो. लहानपणापासूनच गावातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फौजेत जाण्याचे बाळकडू दिले जाते. पणजोबांचा वारसा तिसरी पिढी फौजेत दाखल होऊन चालविला जातो, अशी शेकडो घरं मिलिटरी अपशिंगेमध्ये आढळतात. सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक सैनिक अपशिंगे गावाने दिल्यामुळे या गावाला मिलिटरी अपशिंगे असे नाव पडले आहे. गावात ठिकठिकाणी तरुणांसाठी प्रेरणास्थाने म्हणून फौजेत शहीद झालेल्या जवानांच्या स्मृती अनोख्या पद्धतीने येथे जतन करण्यात आल्या आहेत.
देशासाठी जिल्ह्यातून पहिले बलिदान दिले ते मुगुटराव भोसले यांनी. त्यानंतर साताऱ्यातील तुकाराम सीताराम मोरे यांना २८ जुलै १९४१ रोजी, कोरेगाव तालुक्यातील बोबडेवाडी येथील मारुती जाधव यांना २२ मे १९४४, सातारा तालुक्यातील सोनगाव येथील खाशाबा जाधव यांना १६ जून १९४४, सातारा तालुक्यातील निगडी येथील अंतू देवकर यांना ११ मार्च १९४५, सातारा तालुक्यातील भरतगाववाडी येथील रघुनाथ जाधव यांना २८ आॅक्टोबर १९४५, खटाव तालुक्यातील अनपटवाडी येथील राजाराम घाडगे यांना २९ आॅक्टोबर १९४५ आणि खटाव तालुक्यातील कुरोली येथील महादेव फडतरे यांना १ जून १९४७ रोजी यांना वीरमरण आले.
देशसेवा बजावताना दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना वीरमरण पत्करणारे उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कर्नल संतोष महाडिक यांच्या नावाची नोंद आहे. शहिदांमध्ये शिपाई, हवालदार यांच्यासह लान्स नाईक आणि नाईक या पदावरील जवानांचा समावेश आहे. अद्यापही जिल्ह्यातील जवानांची संख्या वाढत गेली.
सर्वाधिक शहीद सातारा तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यात सर्वाधिक शहीद सातारा तालुक्यातील आहेत. यातही मिलिटरी अपशिंगे येथील शहिदांची संख्या मोठी आहे. सातारा तालुक्यात ९२, कोरेगाव तालुक्यात ३०, वाई तालुक्यात ९, पाटण तालुक्यात १७, खटाव तालुक्यात ३९, कºहाड तालुक्यात २३, फलटण तालुक्यात ६, माण तालुक्यात ११, खंडाळा तालुक्यात ९ तर जावळी तालुक्यात २ जवान शहीद झाले आहेत. शहीद होणाºयांमध्ये शिपाई पदावरील जवानांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात माजी सैनिकांची संख्या २६ हजारांच्या घरात आहे. तर सेवेत कार्यरत असणाºया जवानांची संख्या अर्ध्या लाखाच्या सुमारास आहे. यातही मिलिटरी अपशिंगे आघाडीवर आहे.
जिलेबी वाटून आंनदोत्सव
सातारा जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी मोठ्या प्रमाणावर जिलेबीची खरेदी केली जाते. परस्परांना भेटून जिलेबी वाटण्याचा कार्यक्रम सर्वत्र जोरकसपणे सुरू असतो. देश स्वतंत्र झाला म्हणून अनेकांनी साताºयातील मुख्य चौकात मोफत जिलेबी वाटून हा आनंद साजरा केला. त्यानंतर गेली ७० वर्षे सातारकर परस्परांना जिलेबी देतात.

Web Title: The first martyr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.