शेतकऱ्यांना वाहिलेले देशातील पहिले साहित्य संमेलन
By admin | Published: December 3, 2015 09:53 PM2015-12-03T21:53:14+5:302015-12-03T23:50:51+5:30
आज शाहू कला मंदिरात : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रथमच साताऱ्यात
सातारा : राज्यात निर्माण झालेली दुष्काळस्थिती आणि वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. या विषयावर विचारमंथन व्हावे, यासाठीच कृषिजागर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या विषयाला वाहिलेले हे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिलेच संमेलन ठरणार आहे, अशी माहिती संयोजकाच्या वतीने देण्यात आली.
दरम्यान, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस हे यानिमित्तानं पहिल्यांदाच साताऱ्यात येत आहेत.माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेतर्फे दुसरे कृषिजागर सातारा येथे ४ व ५ डिसेंबर रोजी होत आहे. हे साहित्य संमेलन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना समर्पित केले आहे. दोन दिवसीय या संमेलनात परिसंवाद, कथाकथन, शिवारातील कविता असे विविध कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाध्यक्षापदाची धुरा प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी स्वीकारले आहे. राज्यातील शंभरहून अधिक साहित्यिक या संमेलनाला हजेरी लावणार आहेत.यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा शहरात साहित्यिक चळवळ रुजवण्यात साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने मोलाचे योगदान दिले आहे. या शाखेतर्फे स्थापनेपासून मराठी भाषा पंधरवडा, विभागीय साहित्य संमेलन, सातारा साहित्य संमेलन यासारखे वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. डॉ. प्रकाश आमटे, डॉ. रवींद्र कोल्हे यांच्या कार्याला मदतनिधी देण्याचा वेगळा पायंडा शाहूपुरी शाखेने पाडला आहे. या कार्यात जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, शाहूपुरी शाखेचे किशोर बेडकिहाळ, नंदकुमार सावंत यांचा मोठा वाटा आहे. (प्रतिनिधी)