संसदेत मराठीतून भाषण करणारा पहिला खासदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:23 PM2019-03-31T23:23:44+5:302019-03-31T23:23:49+5:30
दीपक शिंदे सा तारा लोकसभा मतदार संघातून १९५१-५२ मध्ये झालेल्या निवडणुकीत गणेश आळतेकर यांनी सातारा उत्तर लोकसभा मतदार संघाचे ...
दीपक शिंदे
सा तारा लोकसभा मतदार संघातून १९५१-५२ मध्ये झालेल्या निवडणुकीत गणेश आळतेकर यांनी सातारा उत्तर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. तर १९५७ च्या निवडणुकीत क्रांतिसिंह नाना पाटील हे सातारा उत्तर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत होते.
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जनसामान्यांवर चांगला पगडा होता. सातारा आणि सांगली भागात क्रांतिसिंह नाना पाटील यांचा अधिक प्रभाव होता. इंग्रज सरकारला आपले स्थानिक प्रश्न कळणार नाहीत, त्यासाठी आपले सरकार पाहिजे, असे त्यांचे मत होते. केवळ एवढ्यावरच न थांबता त्यांनी स्वत:चे प्रतिसरकार स्थापन केले. गावागावात होणारे तंटे आणि टग्यांचे वाढलेले प्रस्थ नाना पाटील यांनी मोडून काढले. कोणावरही अन्याय होता कामा नये आणि कोणाचाही गैरफायदा घेता कामा नये, यासाठी त्यांनी कटाक्षाने लक्ष घातले.
नाना पाटील हे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र येथील. लहानपणापासूनच दणकट शरीरयष्टी लाभलेले नाना पाटील पाहताक्षणीच अनेकांच्या मनात धडकी भरत होती. त्याबरोबरच त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळे अनेकजण त्यांच्याकडे आकर्षितही होत होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ तलाठ्याची नोकरी केली; पण १९३० मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली आणि या चळवळीकडे ते आकर्षित झाले. त्यामुळे तलाठ्याची नोकरी सोडून त्यांनी स्वातंत्र्यलढा आणि बहुजन सामाजाचा विकास अशा दोन्ही मार्गांनी काम चालू ठेवले.
नानांवर वारकरी सांप्रदायाचा प्रभाव होता. त्यामुळे प्रभावी भाषेत भाषण करून लोकांना आपल्याकडे ओढण्याची कला त्यांच्याकडे होती. लोकांच्या भाषेत आणि ग्रामीण ढंगात होणारी त्यांची भाषणे ऐकण्यासाठीही लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असत. बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी करून घेण्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांचे मोठे योगदान होते. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे, यासाठी ‘आपुला आपण करू कारभार’ असे सूत्र ठेवून त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली होती.
प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, सावकारी मोडून काढणे, बाजारांची व्यवस्था करणे, महिलांवरील अन्याय अत्याचाराला प्रतिबंध करणे आणि गावगुंडांचा बदोबस्त करणे ही कामे त्यांनी पहिल्या टप्प्यात हातात घेतली होती. लोकांसाठी काम करणारा नेता म्हणून नाना पाटील यांची ओळख होती. त्यामुळे मोठा जनसमुदाय त्यांच्या मागे होता.