आधी पवार, नंतर बापट अन् आता शिवतारे

By admin | Published: February 24, 2015 10:52 PM2015-02-24T22:52:11+5:302015-02-25T00:08:15+5:30

उंडाळकरांच्या गाठीभेटी : उलट-सुलट चर्चांना उधाण, जिल्हा बँकेच्या निवडणुकीची नांदी

First Pawar, then Bapat and now Sivatara | आधी पवार, नंतर बापट अन् आता शिवतारे

आधी पवार, नंतर बापट अन् आता शिवतारे

Next

प्रमोद सुकरे - कऱ्हाड  -जिल्ह्याच्या राजकारणातील एक मुरब्बी नेतृत्व म्हणजे विलासराव पाटील-उंडाळकर. काँग्रेसचे आमदार म्हणून त्यांनी सप्तपदी ओलांडली खरी; पण राष्ट्रवादीच्या थोरल्या पवारांबरोबर घनिष्ठ संबंधही त्यांनी कायम ठेवले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांचा भाजप-सेना नेत्यांशी संपर्क वाढलाय. त्यामुळे उंडाळकरांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीचा अंदाज कोणालाच बांधता येईना; पण उंडाळकरांच्या नव्या खेळी जिल्हा बँक निवडणुकीतील नव्या समीकरणाची नांदी मानली जातेय.
विधानसभा निवडणुकीत कऱ्हाड दक्षिणेतून काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर उंडाळकर ‘कमळ’ हातात धरून भाजपवासी होतील, अशी चर्चा होती. मात्र, त्यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत होऊन तात्पुरते का होईना हातात घड्याळच बांधणे पसंत केले. या घड्याळाचा काटा दक्षिणेत काही पुढे सरकलाच नाही. उलट हाच काटा उंडाळकरांना बोचला म्हणे! त्
विधानसभा निवडणुकीपूर्वी उंडाळकरांना भाजपच्या अनेक नेत्यांचे फोन झाले तर अनेक नेते भेटलेही; पण विलासराव त्यांच्या गळाला लागले नाहीत. युतीची सत्ता आल्यानंतर उंडाळकर पुण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीष बापट यांच्या गळाभेटीला पोहोचले. तर सेनेचे विजय शिवतारे पालकमंत्री झाल्यावरही उंडाळकरांनी त्यांची आवर्जून भेट घेतली. आमदार शंभूराज देसार्इंबरोबर शिवतारेंनी नुकतीच साताऱ्यात विलासराव उंडाळकरांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
आजवरच्या कारकिर्दीत उंडाळकरांनी आपल्या राजकीय भूमिकेचा अंदाज कोणालाच लागू दिला नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादीचा वारू असतानाही त्यांनी दक्षिणचा गड अबाधित ठेवला आणि जिल्हा बँकेवरील आपली पकडही; पण सहा वर्षांपूर्वी धाकट्या पवारांनी राष्ट्रवादीअस्त्र वापरून उंडाळकरांची सत्ता काढून घेतली. त्याची सल आजही त्यांच्या मनात आहे.
पालकमंत्री शिवतारेंनी जिल्हा बँक निवडणुकीत युतीचे पॅनेल उभे करण्याचे जाहीर करून टाकलेय. त्यामुळे काठावर उभे राहून, जिल्ह्यात सेना भाजपला हाताशी धरून जिल्हा बँकेत काय घडतंय काय, हे पाहण्याची संधी उंडाळकरांना आपसूकच चालून आलीय आणि ती ते सोडतील, असे वाटत नाही. अजित पवारांनीही जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार असे स्पष्ट केलेय. मात्र, राष्ट्रवादीच्या उमेदवारी यादीत उंडाळकरांचे नाव असणार का? उंडाळकर दुसऱ्या कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाणार का? हे सारे प्रश्न अनुत्तरीतच आहेत.

शंभूराज यांची मध्यस्थी अन् विलासरावांची मोट
शिवसेनेचे जिल्ह्यातील एकमेव आमदार शंभूराज देसाई हे माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांचे नातेवाइक़ देसार्इंना पाटण विधानसभा मतदार संघात विजय संपादन करण्यात उंडाळकर समर्थकांचा हातभार लागल्याचे मानले जाते. आता जिल्ह्याचे राजकारण करण्यासाठी शंभूराज मध्यस्थ्याची भूमिका बजावत उंडाळकरांच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मोट बांधत असल्याचीही चर्चा सर्वत्र सुरू आहे.


कोणता झेंडा घेऊ हाती ?
विलासराव पाटील-उंडाळकरांनी ३५ वर्षे काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतलेला; पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी तो खाली ठेवला. घड्याळ हातात बांधत राष्ट्रवादीचा झेंडा त्यांनी हातात घेतला; पण त्याचा फायदा झालाच नाही. त्यामुळे भविष्यातील राजकीय वाटचाल सुकर करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक एक संधी आहे; पण त्यासाठी कोणता झेंडा घेऊ हाती, असा प्रश्न सध्या त्यांना पडल्याचे बोलले जाते.

Web Title: First Pawar, then Bapat and now Sivatara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.