पहिले पैसे भरा..मग बंदोबस्त घ्या !
By admin | Published: June 20, 2017 05:46 PM2017-06-20T17:46:42+5:302017-06-20T17:46:42+5:30
पोलिसांचा निर्णय : पैसे थकविणाऱ्यांना चपराक
आॅनलाईन लोकमत
सातारा , दि. २0 : पूर्वी पैसे न भरताही पोलिस संरक्षण देत होते. तसेच महिनोमहिने संबंधितांकडून थकीत रक्कम भरली जात नव्हती. त्यामुळे पोलिसांनी यावर उपाय म्हणून पहिले पैसे भरा..मगच बंदोबस्त घ्या, असा नवा नियम लागू केलाय. परिणामी पूर्वीसारखे बंदोबस्त मागणाऱ्यांचे प्रमाणही अपसूकच घटले आहे.
सातारा जिल्हा पोलिसांकडून सध्या १४ जणांना पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. त्यामध्ये खासदार, आमदारांचाही समावेश आहे. मात्र लोकप्रतिनिधींना मोफत बंदोबस्त पुरविला जातो. परंतु खासगी व्यक्तींना बंदोबस्त देताना त्यांच्याकडून २४ तासांचे ६ हजार प्रमाणे महिन्याकाठी साधारण १ लाख रुपये भरावे लागतात. परंतु पूर्वी कोणीही बंदोबस्त मागितल्यानंतर त्याला तत्काळ बंदोबस्त दिला जात होता.
बंदोबस्त दिल्यानंतर हे लोक आज पैसे देतील, उद्या देतील या आशेवर पोलिस बसायचे. त्यामुळे पोलिस अधीक्षकांना अनेकदा कठोर निर्णय घेऊन संबंधितांचा बंदोबस्त काढून घ्यावा लागत होता.