‘हर हर महादेव’च्या गजरात पहिला टिकाव
By admin | Published: April 10, 2017 03:55 AM2017-04-10T03:55:23+5:302017-04-10T03:55:23+5:30
माण तालुक्यात शनिवारी वॉटर कप स्पर्धा-२ सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी १५ हजारांचा
दहिवडी (जि.सातारा) : माण तालुक्यात शनिवारी वॉटर कप स्पर्धा-२ सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी १५ हजारांचा आकडा पार करीत लोकांनी उत्साहात श्रमदान केले. राजवडी ग्रामस्थांनी पहिला टिकाव ‘हर हर महादेव’च्या गजरात मध्यरात्री १२ वाजता मारला आणि कामाला सुरुवात केली.
अभिनेता आमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’मार्फत ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. माण तालुक्यातील एकूण ३२ गावांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. शनिवारी पहिलाच दिवस होता. पुरुष, महिला सकाळी लवकर घरचे काम आटोपून कामाच्या ठिकाणी पोहोचले. शंगणापूरच्या शंभो महादेवाला वंदन करून मध्यरात्रीच्या १२ वाजता राजवडीमधील युवकांनी श्रमदानाला सुरुवात केली. मार्डी येथे फलटणवरून लोकांनी येऊन श्रमदान केले. तर पिंगळीमध्ये अभिषेक करून श्रमदानाला सुरुवात करण्यात आली. अनेक ठिकाणी ‘तुफान आलंया’ या गाण्याच्या आवाजात श्रमदान केले गेले. माण तालुक्यात यात्रांचा हंगाम असूनही या ३२ गावांत पहिल्याच दिवशी १५ हजारांच्या वर लोकांनी श्रमदान केले. अनेक ठिकाणी लुज बोल्डर कामे करण्यात आली. तालुक्यातील प्रत्येकी ८ या प्रमाणे प्रांताधिकारी, तहसीलदार गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी ३२ गावे दत्तक घेतली आहेत. (प्रतिनिधी)