राज्यातील पहिला मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प साताऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 05:03 PM2021-12-18T17:03:46+5:302021-12-18T17:04:05+5:30
सातारा जिल्ह्याने विविध अभियान, योजनांत नावलौकिक मिळविला आहे. या प्रकल्पांना राज्य शासनानेही मान्यता दिली असल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
सातारा : सातारा जिल्ह्याने विविध अभियान, योजनांत नावलौकिक मिळविला आहे. आता अनोखे पाऊल उचलले असून राज्यातील पहिला मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प फलटण तालुक्यातील कोळकी तर प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प कऱ्हाड तालुक्यातील मसूरला होणार आहे. या प्रकल्पांना राज्य शासनानेही मान्यता दिली असल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
सातारा जिल्ह्याचा डंका दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे. राज्य असो किंवा केंद्र शासन दोघांच्याही योजना आणि अभियान जिल्ह्याने यशस्वी केली आहेत. तसेच जिल्हा परिषदेचा नावलौकिकही देशपातळीवर राहिला आहे. संपूर्ण स्वच्छता अभियानात तर विजयी पताका फडकवली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील गावे निर्मलग्राम केली. लोकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणत शौचालय बांधकाम व त्याचा नियमित वापर होण्यासाठी प्रयत्न केले. त्यातच स्वच्छ भारत मिशन टप्पा २ सुरु झाल्यापासून संपूर्ण गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी घर तेथे शौचालय उपक्रम यशस्वीपणे राबवला. तसेच कुटुंबापासून सार्वजनिक स्तरापर्यंत घनकचरा आणि सांडपाणी प्रकल्प उभारण्यात येत आहेत.
आता राज्याला मार्गदर्शक ठरणारा मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प कोळकी येथे होत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर हे यासाठी प्रयत्नशील होते. यासाठी जिल्हा परिषदेने राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे प्रकल्प आराखडा पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाली असून ७५ लाखांचा निधी मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे कोळकी व आसपासच्या गावातील शौचालयांच्या शोषखड्ड्यातील मैला आणि सेप्टिक टँकमधील बाहेर न पडणाऱ्या मैलावर प्रक्रिया करुन व्यवस्थापन होणार आहे. यामधून उत्कृष्ट खत निर्मिती करुन ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढणार आहे. तसेच दूषित पाण्यामुळे होणाऱ्या साथीच्या आजारावर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, मानवी जीवनास घातक ठरणारे व न कुजणाऱ्या प्लास्टिकवरही व्यवस्थापन करण्यात येणार आहे. यासाठीचा प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प मसूर येथे होणार आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या प्रयत्नांना यामध्ये यश आले आहे. राज्य शासनाने याही प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. तसेच १६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. हा प्रकल्प लोकसहभाग आणि ग्रामपंचायतीच्या समन्वयातून राबविण्यात येणार आहे.
राज्यातील हे दोन प्रकल्प साताऱ्यात होत असल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला जाणार आहे, हे निश्चित.