जावळीत राज्यातील पहिले विद्यार्थी कोविड सेंटर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:26 AM2021-07-02T04:26:18+5:302021-07-02T04:26:18+5:30
कुडाळ : जावळीचे खोरे हे इतिहासाची साक्ष देणारे आहे. अनेक त्यागमूर्तींचा वारसा या तालुक्याला लाभला आहे. कोरोनाच्या या महामारीत ...
कुडाळ : जावळीचे खोरे हे इतिहासाची साक्ष देणारे आहे. अनेक त्यागमूर्तींचा वारसा या तालुक्याला लाभला आहे. कोरोनाच्या या महामारीत याची प्रचिती साऱ्यांनाच अनुभवयला मिळाली. या काळात शिक्षणाचे कार्य करीत जावळीतील शिक्षण विभागाने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुलांसाठी धोका लक्षात घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना कोविड उपचार तत्काळ मिळावा, या उदात्त हेतूने जावळीत शिक्षक, केंद्रप्रमुख, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राज्यातील पहिले विद्यार्थी कोविड हेल्थ सेंटर उभारले आहे.
तालुक्यातील अधिकारी, पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून गुरुवारी मेढा या ठिकाणी ‘गुरू चेतना’ या नावाने विद्यार्थी कोविड हेल्थ सेंटर साकारले आहे. याकरिता तालुक्यात कार्यरत असणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी २००० रुपयांप्रमाणे १५ लाख मदतनिधी जमा केला. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक आहे. यामुळेच याची प्राथमिक तयारी म्हणून मुलांकरिता उपचारासाठी सर्व सोयींनीयुक्त असे कोविड सेंटर निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपल्या या योगदानातून शिक्षकांनी निश्चितच समाजाप्रती कृतज्ञता, बांधिलकी जोपासली आहे.
जावळी तालुका शिक्षण विभागातील अधिकारी, केंद्रप्रमुख, कर्मचारी व शिक्षक वृंद यांच्या मदतनिधीतून उभारलेल्या या ‘गुरू चेतना’ कोविड केअर सेंटरचे उद्घाटन बुधवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मेढ्याचे नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, मुख्याधिकारी अमोल पवार, सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवानराव मोहिते, गटशिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे, सुरेश जेधे, अशोक लकडे, रघुनाथ दळवी, विजय पवार, दीपक भुजबळ, सुरेश चिकणे, सुरेश शेलार, सूर्यकांत पवार, अरविंद दळवी, संपत धनावडे, केंद्रप्रमुख , ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
(चौकट)
जावळीतील शिक्षकांचे कार्य दिशादर्शक...
जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकांनी केलेले हे कार्य कौतुकास्पद असून, जिल्ह्याला दिशादर्शक ठरणार आहे, असे गौरवोद्गार काढले. तसेच शिक्षकांनी स्वनिधीतून उभारलेले ‘गुरू चेतना’ विद्यार्थी कोविड हेल्थ सेंटर अद्ययावत आहे. कोविडकाळात तालुक्यातील शिक्षण विभागाच्या कामगिरीचे कौतुक करत सर्वांचे विशेष कौतुकही कले.
पॉईंटर
केंद्रातील सुविधा
-आकर्षक बेडची रचना
-ऑक्सिजनची सुविधा
-प्रोटिनयुक्त आहार देण्याची योजना
-६० बेडची प्रशस्त व्यवस्था
-मुलांसाठी छोट्या खेळण्याची सुविधा
-आकर्षक चित्ररचना (कोट)
भविष्यातील संभाव्य तिसऱ्या लाटेची तज्ज्ञांनी शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून विद्यार्थ्यांना धोका कमी व्हावा, याकरिता विद्यार्थिकेंद्रित कोविड सेंटर उभारले आहे. याकरिता जावळी तालुक्यातील सर्व गुरुजनांनी आपले कर्तव्य म्हणून ही उपाययोजना केली आहे. विद्यार्थी दैवत मानून त्यांच्याप्रती आपली कर्तव्यभावना जोपासली आहे.
-सतीश बुद्धे, गटविकास अधिकारी, जावळी
०१कुडाळ
फोटो: मेढा, ता. जावळी या ठिकाणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते गुरू चेतना कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.