निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रथमच मिळाला ग्रामपंचायतीसाठी हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:43 AM2021-01-16T04:43:17+5:302021-01-16T04:43:17+5:30
वडूज : ग्रामपंचायत निवडणुकीत एक-एक मत महत्त्वाचे असताना निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता येत नव्हता. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त ...
वडूज : ग्रामपंचायत निवडणुकीत एक-एक मत महत्त्वाचे असताना निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता येत नव्हता. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाने दखल घेत अशा कर्मचाऱ्यांसाठी पोस्टलद्वारे मतदान बजावण्याची संधी दिली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता आला.
निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी यासाठी परगावी जाऊन कर्तव्य पार पाडत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मतदानावर आजअखेर तांत्रिक अडचणी येत होते. याबाबत ‘लोकमत’ने सामाजिक व न्याय हक्काच्या लढ्यासंदर्भात आवाज उठविला. यावर जिल्हा प्रशासन व निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद दिला. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी पोस्टल मतदानाची किचकट प्रक्रिया सुरळीत पार पाडली.
खटाव तालुक्यातील नव्वद ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत ७७ हजार ४२ पुरूष व ७४ हजार १३५ महिला असे एकूण १ लाख ५१ हजार १७७ मतदार आपला हक्क बजावत आहेत. मात्र, मतदान अधिकारी १ हजार ४४८, शिपाई कर्मचारी ३६२ व पोलीस कर्मचारी ३६२ अशी नियुक्ती प्रशासनाकडून केली आहे. मतदान प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचारी आणि राखीव मतदार कर्मचारी यांनाही सोमवारी (दि. ११) निवडणूक प्रशिक्षणादरम्यान खटाव तहसील विभागातर्फे चारशे पोस्टल मतपत्रिका पोस्टाने पाठविण्यात आल्या. या पोस्टल मतदान प्रक्रियेसाठी बारा जणांचे पथक असून यामध्ये तालुका कृषी अधिकारी, सात कृषी सहायक, दोन कृषी खात्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि महसूल विभागातील दोघे यांचा समावेश आहे. सध्या सुमारे पन्नास पोस्टल मतदान जमा झाले असून उर्वरित पोस्टल मतदान जमा करण्यासाठी सोमवारी (दि. १८) सकाळी आठ वाजेपर्यंतची मुदत आहे. प्रथमच मिळालेल्या या मतदानाचा आनंद या मतदारांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होता.