इतिहासात प्रथमच दोन महिलांकडून अर्ज दाखल

By admin | Published: October 11, 2016 12:09 AM2016-10-11T00:09:16+5:302016-10-11T00:20:34+5:30

सेवागिरी ट्रस्ट पंचवार्षिक निवडणूक : सहा विश्वस्तांच्या जागेसाठी ४० उमेदवार रिंगणात

For the first time in the history, two women filed nominations | इतिहासात प्रथमच दोन महिलांकडून अर्ज दाखल

इतिहासात प्रथमच दोन महिलांकडून अर्ज दाखल

Next

पुसेगाव : येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टची पंचवार्षिक निवडणूक तिरंगी होत असून, या निवडणुकीसाठी एक अपक्ष, दोन महिलांसह एकूण ४० उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत. देवस्थान ट्रस्टच्या इतिहासात येथील श्री सेवागिरी जनशक्ती संघटनेच्या वतीने नवरात्र उत्सवात महिलांचा आत्मसन्मान राखण्याच्या दृष्टीने प्रथमच महिलांना उमेदवारी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सोमवार, दि. १० आॅक्टोबर २०१६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र (अर्ज) भरण्याची अंतिम तारीख होती. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या होणाऱ्या या निवडणुकीसाठी विद्यमान सत्ताधारी श्री सेवागिरी नागरिक संघटना, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बदल घडवून आणणारी श्री सेवागिरी जनशक्ती संघटना व सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सतत कार्यरत असलेली सेवागिरी ग्रामविकास संघटना या तिन्हीही गटांकडून उमेदवारांचे एकूण ४० अर्ज भरण्यात आले आहेत. डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील श्री सेवागिरी नागरिक संघटनेच्या वतीने सुरेश सर्जेराव जाधव, सुनील जाधव, मोहन जाधव, प्रताप जाधव, संतोष जाधव, योगेश देशमुख, शिवाजी जाधव, संतोष तारळकर, सर्जेराव जाधव व विजय दत्तात्रय जाधव यांनी विश्वस्तांसाठी अर्ज दाखल केले आहेत.
माजी आमदार तात्याराव जाधव यांच्या विचारांच्या श्री सेवागिरी ग्रामविकास संघटनेच्या वतीने विजय जाधव, सतीश फडतरे, जगन्नाथ (जगनशेठ) जाधव, बजरंग
देवकर, सचिन देशमुख, सुसेन जाधव, श्रीकांत जाधव, रामचंद्र जाधव व बाळासाहेब जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर रणधीरशेठ जाधव यांच्या नेतृत्वाखाली श्री सेवागिरी जनशक्ती संघटनेच्या वतीने प्रथमच देवस्थान ट्रस्टच्या या निवडणुकीत नीता जयवंत जाधव व शुभांगी प्रवीणकुमार जाधव या दोन महिलांसह रणधीर सुभाषराव जाधव, शिवानंद (संदीप) जाधव, सुरेश जाधव, श्रीनिवास मुळे, श्रीकृष्ण जाधव, सोपान जाधव, सुहास मुळे, प्रवीण जाधव, तानाजीराव जाधव, केशव भानुदास जाधव, अंकुश
जाधव, संदीप जाधव, बाळकृष्ण जाधव, अशोक जाधव,अरविंद जाधव, अनिल बोडके, विकास जाधव, नीलेश जाधव या १८ उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. तर मिलिंद श्रीधर जाधव यांचा एकमेव अर्ज अपक्ष म्हणून दाखल झाला आहे.
देवस्थानची ही पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक ही तिरंगी होणार असून, कुणाचे अस्तित्व, कुणाची अस्मिता तर कुणाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. ट्रस्टमध्ये आपल्याच गटाचा झेंडा फडकावा, आपल्याच विचारांचे विश्वस्त असावेत यासाठी तिन्ही गटांकडून जोरदार राजकीय फिल्डिंग लावली जात आहे. त्यामुळे तिन्ही गटांमध्ये निकराची झुंज रंगणार आहे. (वार्ताहर)


ज्या माता-भगिनींच्या जोरावर विविध क्षेत्रांत कोणताही पुरुष कर्तृत्ववान बनत असतो, त्या महिलांना गावातील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट निवडणुकीच्या उमेदवारीपासून वंचित का ठेवायचे? याच विचाराने श्री सेवागिरी जनशक्त संघटनेच्या वतीने दोन महिलांना उमेदवारी दिली आहे. देवस्थानच्या इतिहासात या संघटनेच्या वतीने प्रथमच क्रांतीचे पाऊल उचलले आहे.
- रणधीर जाधव, अध्यक्ष, श्री सेवागिरी जनशक्त संघटना

दिवाळी बोनसच्या बिलासाठी ‘बळीराजा’ करणार आंदोलन
पंजाबराव पाटील : वीस तारखेला कारखान्यांविरोधात दुचाकी रॅली
कऱ्हाड : ‘शेतकऱ्यांसाठी भांडणारे व लढणारे नेते आज सत्तेत जाऊन बसले आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. तर दुसरीकडे त्यांच्यासोबत लढणाऱ्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, अशा शेतकऱ्यांच्या पाठीशी बळीराजा शेतकरी संघटना ठामपणे उभी आहे. यंदाची दिवाळी शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने साजरी करता यावी म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळी बोनसची प्रतिटन पाचशे रुपये एफआरपी रक्कम कारखान्यांनी येत्या २० तारखेच्या आत जमा करावी. अन्यथा, कारखान्यांवर दुचाकी रॅली काढण्यात येईल व गळीत हंगामात शेतकरी कारखान्यास ऊस घालणार नाहीत,’ असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला.
कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहात बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील, चंद्रकांत यादव, दीपक पाटील, अशोक सलगर, विश्वास जाधव, साजीद मुल्ला, उत्तम साळुंखे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
यावेळी पंजाबराव पाटील म्हणाले, ‘वर्षभर संघटना बांधण्याचे काम करत असताना पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयासमोर नुकतेच ऊसदरासाठी खरडा-भाकर आंदोलनही केले. त्यावेळी त्यांनी कारखान्यांवर जप्ती आणू असे सांगितले. सध्या दिवाळी सण जवळ आला असल्याने शेतकऱ्यांकडे सण साजरा करण्यासाठी पैसे नाहीत. कारखान्यांनी दिवाळी अ‍ॅडव्हान्स पाचशे रुपयांचा हप्ताही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेला नाही. येत्या वीस तारखेपासून जर शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन पाचशे रुपये हप्ता न दिल्यास कारखान्यांवर दुचाकी रॅली काढण्यात येईल.’
बी. जी. पाटील म्हणाले, ‘सध्या यंदाचा गळीत हंगाम उशिरा सुरू करण्याचा निर्णय शासन व कारखान्यांनी घेतला आहे. हे त्यांचे चुकीचे धोरण आहे. उशिरा कारखाने सुरू झाल्यास त्याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांनाच बसणार आहे. एकेकाळी सरकारच्या विरोधात आंदोलन करणारे, प्रसंगी ऊसदरासाठी रस्त्यावर उतरणारे सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी हे सध्या सरकारबरोबर आहेत. त्यांनी सध्या ऊसदरासाठी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे. मात्र, त्यांच्याकडून तसे केले जात नाही. त्यांनी एकतर रस्त्यावर उतरावे अन्यथा शेतकरी संघटनेचे बिल्ले काढून टाकून आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत.’ (प्रतिनिधी)


या कारखान्यांवर काढणार मोर्चा
‘संघटनेच्या मागण्या मान्य न केल्यास गुरुवार, दि. २० आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता पाचवड फाटा येथून हजारो शेतकरी व संघटनेच्या कार्यकर्त्यांसह राजारामबापू पाटील, कृष्णा कारखाना, सह्याद्री कारखाना, जयवंत शुगर, बाळासाहेब देसाई व रयत सहकारी साखर कारखाना या कारखान्यांवर दुचाकी रॅलीद्वारे निषेध मोर्चा काढण्यात येईल,’ अशी माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील यांनी दिली.
...हे तर स्वत:च्या डोळ्यात बोटे घालण्यासारखेच !
एकेकाळी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शासनाविरोधात लढणारे नेते आज लालदिव्यांच्या गाडीतून फिरत आहेत. त्यांना पदे मिळाल्याने त्यांच्याकडूून आता शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. मध्यंतरी एका नेत्याने शासनविरोधी आंदोलन केले. त्यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आपल्याला किती काळजी आहे हे दाखवून दिले. त्यानंतर त्यांच्या मागण्या मान्यही झाल्या. हे तर सत्तेत असून, सरकारविरोधात लढून जिंकण्यासारखे झाले. हे तर स्वत: च्या डोळ्यात स्वत:च बोटे घालण्यासारखे झाले असल्याची टीका बी. जी. पाटील यांनी केली.

Web Title: For the first time in the history, two women filed nominations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.