एरंडीच्या बिया खाल्ल्याने पाच बालके अत्यवस्थ
By admin | Published: February 19, 2015 10:04 PM2015-02-19T22:04:11+5:302015-02-19T23:47:16+5:30
झाडाखाली खेळत असताना पाच बालकांनी एरंडीच्या बिया खाल्ल्या.
कऱ्हाड : आई-वडील ऊसतोडणी करीत असताना झाडाखाली सावलीला ठेवलेल्या पाच बालकांनी एरंडीच्या बिया खाल्ल्या. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पालकांनी अत्यवस्थ झालेल्या त्या बालकांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उंडाळे, ता. कऱ्हाड येथे गुरुवारी सकाळी ही घटना घडली. भारती राज पावरा (वय ७), अर्जुन जगदीश पावरा (२ वर्ष), करिना जगदीश पावरा (३ वर्ष), रोहित दिलीप पावरा (३ वर्ष) आणि रंजना दिलीप पावरा (५ वर्ष) अशी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बालकांची नावे आहेत. उंडाळे, ता. कऱ्हाड येथे शिवारात गुरुवारी सकाळी ऊसतोडणी सुरू होती. त्यावेळी मजुरांनी त्यांच्या मुलांना झाडाच्या सावलीत बसवले होते. झाडाखाली खेळत असताना पाच बालकांनी एरंडीच्या बिया खाल्ल्या. त्यामुळे काही वेळानंतर त्या बालकांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मुलांच्या पालकांनी त्यांना उपचारार्थ उंडाळेच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. मुलांना विषबाधा झाली असल्याने त्यांना अधिक उपचारार्थ कऱ्हाडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)