सहा गावांच्या पाणी योजनांसाठी पाच कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:25 AM2021-07-08T04:25:51+5:302021-07-08T04:25:51+5:30
कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सहा गावांतील पाणीपुरवठा योजनेसाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ४ कोटी ...
कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सहा गावांतील पाणीपुरवठा योजनेसाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ४ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
घोगाव, बामणवाडी, भुरभुशी, येवती, साळशिरंबे, कोळेवाडी या गावांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. संबंधित गावांनी पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मिळण्याची मागणी केली होती. त्यासाठी गत अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. लोकप्रतिनिधींनाही याबाबत मागणीचे निवेदन देण्यात आले होते. अखेर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी संबंधित गावांची गरज लक्षात घेऊन पाणी योजनेसाठी निधी मंजूर केला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत पुण्याच्या मुख्य अभियंत्यांकडून संबंधित सहा गावांच्या पाणी योजनेच्या कामांना मंजुरी मिळाली होती. ही कामे कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रशासकीय मान्यता आवश्यक असते. त्यानुसार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्राद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठपुरावा केला. आणि सहा गावांच्या नळपाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी प्रशासकीय मंजुरी मिळवून दिली.
जलजीवन मिशन अंतर्गत घोगाव गावासाठी ९५ लाख ४६ हजार, बामणवाडीला १ कोटी १४ लाख ९६ हजार, भुरभुशीला ३८ लाख ८५ हजार, येवतीला १ कोटी १८ लाख ६ हजार, साळशिरंबेला ३७ लाख ४४ हजार, कोळेवाडीला ८५ लाख ४० हजारांचा निधी मंजूर झाला आहे. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली असून कामाची निविदा निघाल्यानंतर ही कामे लवकरच सुरू होणार आहेत.