राज्यात पाचशे रुग्णवाहिका खरेदी करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 06:05 PM2020-08-09T18:05:00+5:302020-08-09T18:06:06+5:30

कऱ्हाड येथे रविवारी सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक झाली.

Five hundred ambulances will be procured in the state, Health Minister Rajesh Tope said | राज्यात पाचशे रुग्णवाहिका खरेदी करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

राज्यात पाचशे रुग्णवाहिका खरेदी करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

googlenewsNext
ठळक मुद्दे"सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत कोरोनाचा डबली रेट ९ ते १० दिवसांचा आहे. हा रेट कमी करायचा आहे."

कऱ्हाड : ‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी काळजी घेत आहे. अनेक ठिकाणी रुग्णवाहिका कमी पडत असल्याची बाब समोर आली असून, राज्यात पाचशे नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्याचा व प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त जागा मुलाखतीद्वारे भरण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कऱ्हाड येथे रविवारी सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामीण विकासमंत्री हसन मुश्रिफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री टोपे म्हणाले, "सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत कोरोनाचा डबली रेट ९ ते १० दिवसांचा आहे. हा रेट कमी करायचा आहे. टेस्टिंगची संख्या वाढविल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. पण अजूनही टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. सातारा येथे टेस्टिंग लॅब नसल्याने त्यांना पुण्यावर अवलंबून राहवे लागत होते. पण सोमवार (दि. १०) पासून सातारा येथे नवीन टेस्टिंग लॅब सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे."

याचबरोबर, वाढती रुग्णसंख्या हा जरी काळजीचा विषय असला तरी मृत्यूदर वाढू नये, याची काळजी सरकार घेत आहे. त्यामुळे कोरोनाचे निदान लवकर व्हावे, यासाठीच्या उपाययोजनांवर भर देत आहोत. खासगी हॉस्पिटल रुग्ण बघत नसल्याच्या अनेकदा तक्रारी येतात. मात्र त्यांनी अँटीजेन टेस्ट किट ठेवाव्यात; पण त्यांनी रुग्ण तपासणी करावी. तसे न केल्यास रुग्णाच्या जीवाशी खेळणा-यांची जिल्हाधिका-यांनी गय करू नये, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

‘खासगी हॉस्पिटलची ८० टक्के बेड ही कोरोनाबाधित रुग्णांना मिळाली पाहिजेत. तसेच रुग्णाचे बिल किती असावे. याबाबतची नियमावली सरकारने दिली आहे. त्यापेक्षा कोणी जास्त बिल आकारत असेल तर ही बाब चुकीची आहे. त्यामुळे अगोदर ते बिल ऑडिटरकडून तपासले गेले पाहिजे. यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. सध्या सरकारी दवाखान्यात डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे इतर खासगी डॉक्टरांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून या महामारी संकटात काम करावे,’ असे आवाहन मंत्री टोपे यांनी केले.

प्रश्न आरोग्यमंत्र्यांना उत्तर सहकारमंत्र्यांचे
क-हाडमध्ये कोरोना बाधितांना बेड मिळत नाहीत. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. मग क-हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध असताना तेथे कोरोना बाधितांवर उपचार का होत नाहीत? याबाबत आरोग्यमंत्र्यांना छेडताच त्याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे मंत्री टोपे म्हणाले. तेवढ्यात सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ‘नॉन कोविड रुग्णांच्या सोयीसाठी उपजिल्हा रुग्णालयात कोविड बाधितांवर उपचार केले जात नाहीत,’ असे उत्तर दिले.

Web Title: Five hundred ambulances will be procured in the state, Health Minister Rajesh Tope said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.