ओढ्यातून काढला पाचशे ट्रॉली गाळ!
By admin | Published: September 11, 2016 11:46 PM2016-09-11T23:46:25+5:302016-09-11T23:46:25+5:30
कात्रेश्वर मंडळाचा उपक्रम : कातरखटावमधील दुष्काळ हटविण्यासाठी एक पाऊल पुढे
कातरखटाव : ‘केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे’ या प्रमाणे कातरखटाव येथील कात्रेश्वर मंडळाने ‘एक गाव, एक गणपती,’ उपक्रम राबवत गावाला उन्हाळ्यात भेडसावणारा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मंडळाने जेसीबी, ट्रॅक्टरच्या साह्याने ओढ्यातील पाचशे ट्रॉली गाळ काढला.
कात्रेश्वर मंडळाने राबविलेल्या उपक्रमामुळे बंधाऱ्यात जादा पाणीसाठा होण्यास मदत होणार आहे. पाच दिवस जेसीबी आणि चार ट्रॅक्टरच्या मदतीने चाललेल्या कामात चारशे ते पाचशे खेपा गाळ उचलला आहे. हा गाळ गरजू शेतक ऱ्यांच्या रानात टाकला आहे. गणेशोत्सवातील वीस हजार मंडळाने सामाजिक बांधिलकी म्हणून वापरला आहे.
१९८३ पासून गेली ३३ वर्ष झाली हे मंडळ सामाजिक बांधिलकीसह नवनवीन उपक्रम राबवत आहे. खर्चाला फाटा देत उन्हाळ्यातला पाणी प्रश्न लक्षात घेता ओढ्यातील गाळ काढणे, गरजू रुग्णांना मदत करणे, प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, स्लो सायकल स्पर्धा घेतल्या जातात. वह्या-पुस्तकांचे वाटप केले जाते. कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून कात्रेश्वर बेंगलोर ग्रुप, कात्रेश्वर मुंबई ग्रुप या दोन शाखा निर्माण केले आहेत. (वार्ताहर)
डॉल्बीमुक्तीसाठी जनजागृती...
कातरखटावसह परिसरातील मंडळांनी ‘डॉल्बीमुक्त मंडळ’ करून एक आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे. अन्य मंडळे कर्कश आवाजात गाणी लावून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आवाज वाढवून टाहो फोडताना दिसत आहेत. त्यामुळे भागातील मंडळांनी आदर्श निर्माण करण्याची गरज आहे. कात्रेश्वर मंडळाचा इतरांनी आदर्श घेतल्यास खऱ्या अर्थाने क्रांती घडणार आहे.
शैक्षणिक साहित्य...
या गणेशोत्सवात आम्ही मंडळाच्या वतीने हायस्कूलच्या मुला-मुलीनां शैक्षणिक साहित्याचे वाटप करणार आहोत. मंडळातर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून लोकसहभागातून जमणाऱ्या निधीतून चांगले उपक्रम राबविले जातील.
- विक्रम बागल, अध्यक्ष, कात्रेश्वर मंडळ