अरबी समुद्रात पाच किलोमीटर पोहण्याचा भांडे-पाटील कुटुंबाचा विक्रम : शिरवळचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 08:43 PM2018-04-04T20:43:52+5:302018-04-04T20:43:52+5:30
शिरवळ : अरबी समुद्रातील संकरॉक लाईट हाऊस ते गेट वे आॅफ इंडिया हे पाच किलोमीटरचे अंतर एक तास एकवीस मिनिटांत पार करण्याचा विक्रम शिरवळच्या सूर्यकांत भांडे-पाटील यांच्या कुटुंबाने
शिरवळ : अरबी समुद्रातील संकरॉक लाईट हाऊस ते गेट वे आॅफ इंडिया हे पाच किलोमीटरचे अंतर एक तास एकवीस मिनिटांत पार करण्याचा विक्रम शिरवळच्या सूर्यकांत भांडे-पाटील यांच्या कुटुंबाने नोंदविला. या मोहिमेत सूर्यकांत भांडे-पाटील यांच्यासमवेत पत्नी प्रतिभा व मुलगा सौरभ यांनी सहभाग घेतला.
जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास असेल अन् त्याला कुटुंबाची साथ लाभली तर थैमान घालणाऱ्या समुद्राच्या बेभान लाटांनाही थोपविण्याची ताकद निर्माण होते. अशीच किमया शिरवळ येथील सूर्यकांत भांडे-पाटील यांच्या संपूर्ण कुटुंबाने करून दाखविली. बांधकाम व्यावसायिक सूर्यकांत भांडे-पाटील त्यांची पत्नी प्रतिभा प्राथमिक शिक्षिका आहेत. पन्नास वर्षीय या जोडप्याने जलतरणपटू असलेला मुलगा सौरभला सोबत घेत अरबी समुद्र्रामध्ये एकाच वेळी एकाच वेगात पोहून विश्वविक्रम करण्याचा संकल्प केला. यासाठी भांडे-पाटील दाम्पत्य वेळ मिळेल तसा सराव करू लागले. शिक्षणासाठी बाहेर असलेल्या सौरभला सरावासाठी कमी वेळ मिळाला.
भांडे-पाटील कुटुंबीयांनी मुंबई येथील संकरॉक लाईट हाऊस ते गेट-वे आॅफ इंडिया हे पाच किलोमीटरचे अंतर प्रशिक्षक सतीश कदम, बाळासाहेब घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य जलतरण संस्थेचे निरीक्षक निल दबडे, विनय शहा यांच्या निरीक्षणाखाली व मुंबई येथील संजय कोळी यांच्या पाच बोटींच्या सहकार्याने पार केले. ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ’च्या गजरात व ‘जय भवानी, जय शिवाजीऽऽ’च्या जयघोषात संकरॉक लाईट हाऊस येथून अरबी समुद्र्रात थैमान घालत असलेल्या लाटांच्या तुफानाला सामोरे गेले. एकाच वेळी एकाच वेगाने भांडे-पाटील कुटुंबीय गेट वे आॅफ इंडियाच्या दिशेने मार्गस्थ झाले. हे अंतर दोन तासांमध्ये पूर्ण करण्याचा अंदाज बाळगत असताना दृढ निश्चयाच्या आधारावर अवघ्या एक तास एकवीस मिनिटांमध्ये पार करीत एक आगळावेगळा संपूर्ण कुटुंबाने समुद्र्राच्या लाटेवर स्वार होण्याचा संकल्प पूर्ण केला.
यावेळी विश्वविक्रमी वेळेत पाच किलोमीटरचे अंतर पोहून पार केल्याबद्दल भांडे-पाटील कुटुंबीयांचा विविध संघटनांतर्फेगेटवे आॅफ इंडिया याठिकाणी सत्कार केला. मोहिमेसाठी संकेत भांडे पतसंस्था शिरवळ, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना, रणमर्द तानाजी तरुण मंडळ, भोंगवली, शिरवळ ग्रामस्थ, सद्गुरू शंकर महाराज क्रीडा प्रतिष्ठान, शिरवळ ग्रामस्थ, राजमुद्र्रा हौसिंग सोसायटी यांनी सहकार्य केले.
कोट
आमचा मुलगा सौरभ याच्यासमवेत अरबी समुद्र्रात विश्वविक्रम केल्यानंतर संपूर्ण कुटुंबानेच जागतिक पोहण्याचा आगळावेगळा संकल्प केला. याक्ररता नेहमीच प्रत्येक क्षणात माझा खांद्याला खांदा लावून लढा देणारी पत्नी प्रतिभा याची मोलाची साथ या संकल्पाला जिद्दीने मिळाली.
- सूर्यकांत भांडे-पाटील
बांधकाम व्यावसायिक, शिरवळ
छायाचित्र -
०४शिरवळ
मुंबई येथील संकरॉक लाईट हाऊस ते गेटवे आॅफ इंडिया अंतर पोहून जाण्याचा विक्रम केल्यानंतर सूर्यकांत, प्रतिभा व राहुल भांडे-पाटील यांनी आनंदोत्सव साजरा केला.