विद्यार्थ्यांची पाच किलोमीटरची पायपीट अखेर थांबली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 02:04 PM2017-07-22T14:04:23+5:302017-07-22T14:04:23+5:30
पाचगणी-विवर बससेवा सुरू; ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त
आॅनलाईन लोकमत
पाचगणी (जि. सातारा), दि. २२ : विवर-पाचगणी बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची अनेक महिन्यांपासून सुरू असलेली पायपीट अखेर थांबली. या बसमुळे विवरसह सहा गावांतील ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. विवर-पाचगणी या पहिल्या एसटी बसचे गावातील माहिलांनी पूजन केले. तसेच चालक व वाहक यांचा सत्कारही करण्यात आला.
विवरसह दुर्गम भागातील ग्रामस्थांना कामकाजासाठी व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज पाचगणीला यावे लागते; परंतु विवरहून पाचगणीला येण्यासाठी एसटी बसच नसल्याने सुमारे चार-पाच किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन एसटीसाठी पानस पाटीपर्यंत यावे लागत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची ही परवड सुरू होती.
या गैरसोयीबाबत गावातील जय भवानी नेहरू युवा मंडळातील युवा कार्यकर्त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्याकडे उपाय योजना करण्याची मागणी केली. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी परिवहन विभागास विवर-पाचणगी एसटी सुरू करण्याचा सूचना केल्यानंतर ही बससेवा तातडीने सुरू करण्यात आली. या एसटी बसमुळे विभागातील विवर, कावडी, हातगेघर, साईघर, पानस, आखेगनी या सहा गावांतील कष्टकरी लोकांची व विद्यार्थ्यांची अनेक महिन्यांपासूनची पायपीट अखेर थांबली.