स्वच्छता मतदानात पाच लाख विद्यार्थी सहभागी- ३ हजार ८२० शाळांमध्ये प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:08 AM2019-02-16T00:08:27+5:302019-02-16T00:09:12+5:30
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, तसेच जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय मुलांच्या स्वच्छता मतदानात जिल्ह्यातील ३८२० शाळांनी सहभाग घेतला.
सातारा जिल्हा परिषदेतून
सातारा : विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, तसेच जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय मुलांच्या स्वच्छता मतदानात जिल्ह्यातील ३८२० शाळांनी सहभाग घेतला. तर या प्रक्रियेत तब्बल ४ लाख ८९ हजार ४४८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदान केले. यामुळे लोकशाहीबरोबरच स्वच्छतेचा संदेशही विद्यार्थ्यांत पोहोचण्यास मदत झाली.
जिल्ह्यात प्लास्टिक संकलन मोहीम आणि त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेसाठी जनाजागृती व्हावी, यासाठी शालेय स्तरावर स्वच्छता मतदान घेण्यात येत आहे. यंदाच्या दुसऱ्यावर्षी या दोन्ही उपक्रमाला जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभला. जिल्ह्यात शुक्रवारीही जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता आणि शिक्षण विभागाच्या वतीने स्वच्छता मतदान घेण्यात आले.
यावर्षी या उपक्रमात जिल्ह्यातील प्राथमिक विभागाच्या सर्वच म्हणजे ३८२० शाळा सहभागी झाल्या होत्या. त्यामधील ५ लाख १५ हजार २०८ पैकी ४ लाख ८९ हजार ४४८ विद्यार्थ्यांनी मतदानात सहभाग घेतला. या मतदान प्रक्रियात ७ प्रश्नांवर होय किंवा नाही, असे मत नोंदविता येणार होते. यामध्ये सातारा आणि कºहाड तालुक्यांतील विद्यार्थ्यांच्या स्वच्छता मतदानाची टक्केवारी सर्वात अधिक म्हणजे ९७ टक्के राहिली. तर कोरेगाव आणि पाटण तालुक्यात ९६, खंडाळा, वाई, जावळी, माण, खटाव तालुक्यांत ९५ तर महाबळेश्वर तालुक्यात सर्वात कमी स्वच्छता मतदानाची टक्केवारी ९३ टक्के असून, जिल्ह्याची सरासरी ९५ टक्के राहिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांत स्वच्छतेची जागृती होतेय.
अधिकाºयांच्या शाळांना भेटी...
शालेय स्तरावर स्वच्छता मतदान होते. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) किरण सायमोते, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, राजेश इंगळे आदींनी शाळास्तरावर भेट देऊन विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. तर पाणी व स्वच्छता विभागाने गेल्या काही दिवसांपासून याबाबत चांगली तयारी केल्याचे दिसून आले.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच स्वच्छतेविषयक जागृती व्हावी, यासाठी दोन वर्षांपासून स्वच्छता मतदान घेण्यात येत आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे लोकशाहीतील मतदान प्रक्रिया आणि स्वच्छता संदेश असा दुहेरी संगमाचा हेतू सफल झाला आहे. या मतदानप्रक्रियेत सहभाग घेणाºया विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
- डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी
सातारा शहराजवळील कृष्णानगरच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयक मतदान केले. यावेळी डॉ. कैलास शिंदे, किरण सायमोते, प्रभावती कोळेकर आदी उपस्थित होते.