राज्यात पाच लाख शेतकऱ्यांना सौरपंप !
By admin | Published: January 10, 2016 12:53 AM2016-01-10T00:53:48+5:302016-01-10T00:53:48+5:30
चंद्रकांतदादा : म्हसवडमध्ये बंधाऱ्याचे लोकार्पण
म्हसवड : ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून राज्यातील तीस हजार गावे टंचाईमुक्त करण्याचा संकल्प आहे. राज्यात विजेचा तुटवडा असून, पाणी असूनही शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्यातील सुमारे पाच लाख शेतकऱ्यांना सौरपंपाचे वाटप करण्यात येईल,’ अशी घोषणा सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.
म्हसवड येथे माणदेशी फाउंडेशनतर्फे ‘जलयुक्त शिवार’अंतर्गत नूतन बंधाऱ्याचे भूमिपूजन व पुळकोटी येथील गलांडे वस्तीवरील बंधाऱ्याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष विजय धट, फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार सुरेखा माने, गटविकास अधिकारी सीमा जगताप, मुख्याधिकारी पल्लवी भोरे-पाटील, जयेश मोदी, रेखा कुलकर्णी, जवाहर देशमाने उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांना आधुनिक बी-बियाणे उपलब्ध
करून देण्यात येणार आहे. कमी पाण्यावर शेती करण्यासाठी मागेल त्याला
ठिबक सिंचन, गावोगावी शेतीमाल प्रक्रिया केंद्र, गोदाम, शीतगृह तसेच पणनच्या माध्यमातून शेतीमालाला दर मिळवून दिला जाणार आहे. शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणदेशी फाउंडेशनचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.’
आमदार गोरे म्हणाले, ‘सध्याच्या शासनाने जलयुक्त शिवारच्या नावाखाली कामे सुरू केली आहेत. याची सुरुवात माणच्या मातीतून झाली, याचा अभिमान आहे.
माणच्या मातीत रुजलेली संकल्पना सरकारने दुष्काळ निवारणाच्या कार्यात स्वीकारली याचा आनंद वाटतो.’
चेतना सिन्हा म्हणाल्या, ‘२०१२ चा भीषण दुष्काळ आपणाला खूपकाही शिकवून गेला. येथील शेतकऱ्यांवर अशी वेळ येऊ नये. म्हणून पावसाचा थेंबन्थेंब अडवण्याचे ठरविले.
त्यासाठी म्हसवड परिसरातील सतरा नाला बंधाऱ्यांतील गाळ काढला. सहा ठिकाणी पाणी साठवण सिमेंट बंधारे बांधले. यामध्ये सुमारे सात ते दहा कोटी लिटर पाणीसाठा झाला.’
यावेळी माजी नगराध्यक्ष अजितराव राजेमाने, नितीन दोशी, वसंत मासाळ, युवराज सूर्यवंशी, बाळासाहेब मासाळ, डॉ. राजेंद्र खाडे, बाळासाहेब मदने, दिलीप तुपे, किशोर सोनवणे, अप्पा पुकळे, ताराबाई साठे, प्रतिभा लोखंडे, रंजना रसाळ, मारुती वीरकर, बबन अब्दागिरे, सुरेश म्हेत्रे, रवींद्र वीरकर, सूरज ढोले उपस्थित होते. (प्रतिनिधी)