corona virus सातारा जिल्ह्यात आणखी पाचजण कोरोना पॉझिटिव्ह; बाधितांचा आकडा ५२१ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:59 PM2020-06-01T12:59:02+5:302020-06-01T13:00:18+5:30
जिल्ह्यात आत्तापर्यंत ५२१ कोरोना बाधित रुग्णांची संख्या असून, त्यापैकी १६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३४० कोरोना बाधितांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढत असून, सोमवारी आणखी पाचजण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्याचा बाधितांचा आकडा आता ५२१ वर पोहोचला आहे. तसेच मृत्यूपश्चात पाचजणांच्या अहवालाबरोबरच २३७ जणांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्यामुळे एकीकडे दिलासा मिळत आहे. मात्र, दुसरीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.
सोमवारी सकाळी आणखी पाचजण कोरोना बाधित आढळून आले. त्यामध्ये पाटण तालुक्यातील नवसरवाडी येथील १ (६० वर्षीय पुरुष), वाई तालुक्यातील वोव्हाळी येथील १ (४२ वर्षीय पुरुष), जांभळी येथील १ (११ वर्षीय मुलगी), महाबळेश्वर तालुक्यातील कोट्रोशी येथील १ (१० वर्षीय मुलगी) व हरचंदी येथील १ (६३ वर्षीय पुरुष) अशा एकूण ५ रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. तसेच महाबळेश्वर तालुक्यातील झांजवड येथील ५७ वर्षीय पुरुष, पाथरवाडी, ता. कºहाड येथील ३३ वर्षीय पुरुष, साता-यातील बुधवार पेठेतील ६५ वर्षीय महिला, अंबेदरे आसरे ता. वाई येथील ४३ वर्षीय महिला तसेच उंब्रज ता. कºहाड येथील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू पश्चात अहवाल निगेटिव्ह आला आहे.
पुणे येथून २२८ तर क-हाड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमधील ९ अशा २३७ जणांचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, जावळी तालुक्यातील रांजणी येथून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेल्या ८५ वर्षीय मृत महिलेचा नमुनाही पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात नव्याने १४ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत ५२१ कोरोना बाधित रुग्णांची संख्या असून, त्यापैकी १६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३४० कोरोना बाधितांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.