गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील पाच तळी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 11:01 PM2017-08-27T23:01:33+5:302017-08-27T23:01:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शहरात घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींची उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. या सर्व गणेशमूर्तींचे शहरातील विविध पाच ठिकाणच्या तळ्यांमध्ये विसर्जन करण्यात येणार आहे. यामध्ये पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चार कृत्रिम तळ्यांचा समावेश आहे.
शहरातील घरगुती व सार्वजनिक गणेशमंडांच्या मूर्तींचे विसर्जन याही वर्षी पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे. विसर्जनासाठी पालिकेने चार कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. यापैकी गोडोली, हुतात्मा स्मारक व दगडी शाळा परिसरातील कृत्रिम तळ्यांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
मोती तळ्याच्या समोर असलेल्या पालिकेच्या जलतरण तलावातही यावर्षी घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. या तलावात जवळपास साडेसात लाख लिटर पाण्याची गरज भासणार असून, तलाव भरण्यासाठी शुक्रवारपासून पाणी सोडण्यात आले आहे. शाडूमातीचा पाण्यावर परिणाम होऊ नये, यासाठी पालिकेच्या वतीने तलावात ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्यात आली आहे.
सार्वजिनक गणेश मंडळांच्या मोठ्या मूर्तींचे विसर्जन प्रतापसिंह शेती फार्म हाऊसच्या कृत्रिम तलावात केले जाणार असून, या तलावाचे खोदकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. सोमवारपर्यंत (दि.२८) हे काम पूर्ण होणार असून, यानंतर तलावात प्लास्टिक लायनर टाकून पाणीसाठा केला जाणार आहे.
पालिकेकडून निर्माल्य कलश
गणेशोत्सवात पावित्र्य व स्वच्छता राखली जावी, यासाठी पालिकेच्या वतीने विसर्जन ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात येणार आहे. पालिकेसह विविध सामाजिक संस्थांच्या वतीनेही निर्माल्य कलश उपलब्ध केले जाणार आहेत. विसर्र्जन ठिकाणी पालिकेच्यावतीने पाण्याच्या टाक्याही ठेवल्या जाणार आहेत. भाविकांनी कलशामध्येच निर्माल्य टाकावे, असे आवाहन करण्यात आले आहे.