बैलगाडा शर्यत आयोजित करणाऱ्या पाचजणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:26 AM2021-07-21T04:26:12+5:302021-07-21T04:26:12+5:30
पुसेगाव : खटाव येथील हुसेनपूर शिवारात बैलगाडा शर्यत आयोजित करणाऱ्या आयोजकासह इतर चारजणांवर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...
पुसेगाव : खटाव येथील हुसेनपूर शिवारात बैलगाडा शर्यत आयोजित करणाऱ्या आयोजकासह इतर चारजणांवर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खटावजवळील हुसेनपूर शिवारात दि. १८ रोजी बैलगाडा शर्यती सुरू असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी आयोजक गोरख शंकर बोर्गे तसेच इतर चार बैलगाडा (छकडा) चालक व मालक यांच्यावर भारतीय दंड संहिता व वन्यप्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार सुधाकर भोसले तपास करत आहेत.
खटावनजीकच्या हुसेनपूर शिवारात वारंवार अशा शर्यतींचे आयोजन होत असल्याने पुसेगाव पोलीस ठाण्याच्यावतीने ज्या जमिनीवर शर्यती होतात. त्या जमीनमालकांना शर्यती भरवू न देण्याबाबत यापूर्वीच नोटीस दिली आहे. मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अशा शर्यती अजूनही सुरूच आहेत. एखाद्या गावात, भागात, शिवारात अशा बेकायदा शर्यती होत असतील, तर त्याची माहिती तत्काळ पुसेगाव पोलिसांना द्यावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी केले आहे.