साठ गावांसाठी पाच पोलीस पाटील!

By admin | Published: September 6, 2015 08:37 PM2015-09-06T20:37:14+5:302015-09-06T20:37:14+5:30

ढेबेवाडी विभागातील स्थिती : रहिवासी दाखला मिळविण्यासाठी युवकांची धडपड

Five policemen for sixty villages! | साठ गावांसाठी पाच पोलीस पाटील!

साठ गावांसाठी पाच पोलीस पाटील!

Next

ढेबेवाडी : साठ गावे, दोनशे वाड्या वस्त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या ढेबेवाडी पोलीस ठाण्यांतर्गत एक लाखांवर लोकसंख्येसाठी केवळ पाच पोलीस पाटील कार्यरत आहेत. पोलीस पाटलांची सुमारे पन्नास पदे रिक्त असल्याने शासकीय कामी आवश्यक असणारा पोलीस पाटलांचा रहिवासी दाखला सामान्यांना मिळत नाही. परिणामी, नोकर भरतीत इच्छुकांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, कागदपत्रांतील पोलीस पाटलांच्या रहिवासी दाखल्याची अट रद्द करा, अथवा पर्यायी व्यवस्था करा, अशी मागणी होत आहे. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात काळगाव आणि मंद्रुळकोळे असे दोन जिल्हा परिषद गट आहेत. धरणग्रस्त, पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त आणि आपत्तीग्रस्त अशा नैसर्गिक संकटांनी गुरफटलेल्या येथील जनतेला नेहमीच विविध अडचणींचा सामना करावा लागतो. धरणग्रस्त, डोंगरी आणि भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांना आता शासकीय नोकरीतही शासनाने आरक्षण जाहीर केल्याने शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच इच्छुक नोकरीसाठी धावाधाव करतानाचे चित्र आहे.
शासकीय नोकरीसाठी संबंधितांच्या शैक्षणिक पात्रतेसह सरपंच, गावकामगार तलाठी, पोलीस पाटील आदींचे रहिवासी दाखले आवश्यक केले आहेत.
ढेबेवाडी विभागातील इच्छुकांना सरपंच, तलाठी यांचे दाखले उपलब्ध होत आहेत. मात्र गावे साठ आणि पोलीस पाटील पाच अशी अवस्था असल्याने पोलीस पाटलांचा रहिवासी दाखला मिळविताना मोठी कसरत होऊ लागली आहे.
दरम्यान, पोलिसांचा खबऱ्या म्हणून ओळख असलेला गावोगावचा पोलीस पाटीलच पोलिसांपासून दुरावल्याने पोलिसांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या काढणे गावापासून वाल्मिकी पठारावरील कसणी-धनगरवाड्यापर्यंत सुमारे चाळीस किलोमीटर अंतरात एकही पोलीस पाटील कार्यरत नाही.
परिणामी, पोलिसांचा या गावांशी संपर्कच तुटल्याने पोलिसांचीही मोठी दमछाक होत आहे. मुळातच लोकसंख्येच्या प्रमाणात अत्यल्प पोलीस कर्मचारी आणि त्यातच पोलीस पाटलांची सुमारे ५० पदे रिक्त असल्याने गावोगावी संपर्क साधताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. (वार्ताहर)

वरिष्ठांकडे पाठपुरावा...
याबाबत पाटण प्रांत कार्यालयाशी संपर्क साधला असता, या वस्तुस्थितीचे समर्थन केले. तसेच पोलीस पाटलांच्या रिक्त पदाबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा चालू असून, लवकरच या पदांचा
जाहीरनामा प्रसिद्ध करून कार्यवाहीची प्रक्रिया पूर्ण होईल, असेही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. .

कुणीतरी दाखले द्यावे !
या विभागात आता तरुणांमध्ये पोलीस आणि सैन्यदलाचे आकर्षण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अ‍ॅकॅडमीचीही साथ त्यांना मिळाल्याने तरुणांची पावले पोलीस-सैन्यदलाकडे वळू लागली आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची गोळाबेरीज करताना दमछाक होऊ लागली असतानाच पोलीस पाटलांचा
रहिवासी दाखला मिळत नसल्याने तरुणांमध्ये नाराजी
पसरली आहे.

Web Title: Five policemen for sixty villages!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.