विसर्जनासाठी पाच तळी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:46 AM2021-09-14T04:46:03+5:302021-09-14T04:46:03+5:30
सातारा : पाच दिवसांच्या बाप्पांना व गौराईला मंगळवार, दि. १४ रोजी निरोप दिला जाणार असून, पालिकेची तयारी पूर्ण झाली ...
सातारा : पाच दिवसांच्या बाप्पांना व गौराईला मंगळवार, दि. १४ रोजी निरोप दिला जाणार असून, पालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. विसर्जनासाठी पालिकेने जलतरण तलाव व चार कृत्रिम तळ्यांची उभारणी केली आहे. तसेच ठिकठिकाणी पाण्याचे कुंड व निर्माल्य कलशाची व्यवस्थाही केली आहे.
गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी जिल्हा तसेच पालिका प्रशासनाने उत्सव सुरू होण्यापूर्वीच तयारी सुरू केली आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा सार्वजनिक मंडळांनी कमी उंचीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली. अनेक मंडळांनी यंदा रस्त्यावर मंडपही उभारले नाहीत. तर पालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही जलतरण तलावासह हुतात्मा स्मारक, कल्याणी शाळा, दगडी शाळा व बुधवार नाका येथे कृत्रिम तळ्यांची उभारणी केली आहे. या तळ्यांत पाणीसाठा करण्यात आला असून, बॅरिकेटिंग, वीज, मूर्ती विसर्जनासाठी मचान अशी कामेही पूर्ण झाली आहेत.
बुधवार नाक्यावरील सर्वात मोठ्या कृत्रिम तळ्यात दहा दिवसांच्या व गणेश मंडळांच्या मूर्तींचेच विसर्जन केले जाणार आहे. विसर्जनासाठी शंभर टन वजनाची हायड्रोलिक क्रेन पुण्याहून मागविली जाणार आहे. सर्वच तळ्यांवर सुरक्षारक्षकांची नेमणूकही केली जाणार आहे. पाच
(चौकट)
गर्दी टाळण्याचे आवाहन
कोरोना परिस्थिती पाहता नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी जागोजागी ठेवण्यात आलेल्या कुुंडांमध्ये व जवळच्या कृत्रिम तळ्यातच मूर्ती विसर्जन करावे, तळ्यावर गर्दी होऊ नये, यासाठी विसर्जनाला येण्यापूर्वीच मूर्तीची पूजा-अर्चा करावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
(चौकट)
तळ्यांवर सीसीटीव्हीची नजर
पोलीस दलाच्या वतीने शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा विसर्जन मार्गावर पालिकेकडून सीसीटीव्ही बसविले जाणार नाही. परंतु सुरक्षिततेसाठी चार कृत्रिम तळी व तलतरण तलाव येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
(पॉइंटर)
- कृत्रिम तळ्यांवर सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत मूर्ती विसर्जन केले जाईल
- विसर्जनासाठी घरातील केवळ दोन सदस्यांना परवानगी राहील
- विसर्जनस्थळी आरती होणार नाही. त्यामुळे विसर्जनाला येण्यापूर्वीच आरती करावी
- फिजिकल डिस्टन्सचे पालन व मास्कचा वापर बंधनकारक
- दि. १९ सप्टेंबर रोजी बुधवार नाक्यावरील मोठ्या तळ्यात गणेशमंडळांच्या मूर्तींचे विसर्जन होईल.
(पॉइंटर)
येथे आहे कुंडांची व्यवस्था
फुटका तलाव ६
मंगळवार तळे ६
गौखले हौद १
पंताचा गोट १
रामाचा गोट ३
विश्वेश्वर मंदिर ३
न्यू इंग्लिश स्कूल १
करिअप्पा चौक सदर बझार २
फोटो : १३ कृत्रिम तलाव