मार्डीत पाच दरोडेखोरांना अटक
By admin | Published: January 25, 2015 12:39 AM2015-01-25T00:39:38+5:302015-01-25T00:40:02+5:30
ग्रामस्थांची समयसुचकता : मंदिराशेजारी दबा धरून बसलेल्यांपैकी एक फरार
पळशी : मार्डी येथील भवानी माता मंदिराशेजारी आज, शनिवारी पहाटे पावणेसहाला पाच-सहाजण दबा धरून बसल्याचा संशय आल्याने ग्रामस्थांनी दहिवडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येत या दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील पाचजणांना अटक केली. एकजण पोलिसांना गुंगारा देत पळून गेला. त्यांच्याकडून धारदार चाकू व इतर साहित्य जप्त केले आहे.
विशाल विलास काळे (वय १९, रा. राजीव गांधी झोपडपट्टी, कर्जत, जि. अहमदनगर), योगेश सदाशिव भोसले (१९, रा. करवडी, ता. कर्जत), वंद्या ऊर्फ वंदेक लक्ष्मण शिंदे (४६, रा. विसापूर, ता. खटाव), परशा ऊर्फ प्रशांत मुकेश काळे (२१, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, तासगाव, जि. सांगली), आलिशा ऊर्फ आलिशान डांबिशा काळे (३९, रा. औंध, ता. खटाव) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
दहिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्डी येथील शिंगणापूर-म्हसवड मार्गावरील भवानी माता मंदिराशेजारी असलेल्या लमाणबाबा मंदिराच्या आडोशाला सहाजण दबा धरून बसले होते. त्यांचा संशय आल्याने ग्रामस्थांनी तत्काळ दहिवडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांना याची कल्पना दिली.
चवरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून शिंगणापूर पोलीस दूरक्षेत्रात दूरध्वनीद्वारे माहिती देऊन कर्मचारी पाठवून दिले. ग्रामस्थ व पोलिसांनी योग्य समन्वय ठेवल्याने अवघ्या दहा मिनिटांत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी मार्डी ग्रामस्थही जमा झाले होते.
पोलीस अन् ग्रामस्थ येत असल्याचे पाहून दरोडेखोर पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यामुळे पाठलाग करून तिघांना, तर दोघांना जाग्यावरच पकडले. अतुल ऊर्फ अतल्या नीलगीर शिंदे (रा. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव) हा पळून गेला असून, याचा रात्री उशिरापर्यंत पोलीस शोध घेत होते. अटक केलेल्यांकडे एक सॅक सापडली असून, त्यामध्ये धारदार सुरा, ब्लेड, मोठा सुरा, मोबाईल, कात्री सापडली. ते साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
शिंगणापूर पोलीस दूरक्षेत्रातील सी. एम. राक्षे, डी. ए. शिंदे, आर. बी. फडतरे, ए. के. चांगण, उमेश कोळी तसेच दहिवडीचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे, उपनिरीक्षक एस. बी. कवडे, प्रकाश इंगळे यांनी चोरट्यांना पकडण्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. दहिवडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.