ग्रामीण रुग्णालयातील पाच जागा दोन वर्षे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:41 AM2021-04-23T04:41:37+5:302021-04-23T04:41:37+5:30
महाबळेश्वर : येथील ग्रामीण रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिका अशा पाच जागा दोन वर्षे रिक्त आहेत. त्यामुळे ...
महाबळेश्वर : येथील ग्रामीण रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिका अशा पाच जागा दोन वर्षे रिक्त आहेत. त्यामुळे महाबळेश्वरच्या नागरिकांची आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर आहे.
पालकमंत्री व गृहराज्यमंत्री जिल्हाभर फिरत आहेत परंतु महाबळेश्वरकडे त्यांचे अद्याप लक्ष गेले नाही. त्यामुळे शहरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी येथे ग्रामीण रुग्णालय आहे. या रुग्णालयातील आरोग्य सेवेचे बारा वाजले होते म्हणून दोन वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालय काही अटी आणि शर्थींवर रेडक्राॅस संचलित बेल एअरकडे हस्तांतरीत केले. रुग्णालय ताब्यात घेताना संस्थेने अनेक अटी मान्य केल्या; परंतु त्यानंतर विसर पडला. रुग्णालयात आलेल्या रुग्णांवर उपचाराबरोबर राज्य व केंद्र सरकारच्या सर्व आरोग्य योजनांची अंमलबजावणी करण्याचे संस्थेने मान्य केले होते. घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करणे, कोणत्या घरातील व्यक्तीला कोणता रोग आहे याची नोंद करणे
माता संगोपन, कुपोषण, रोग निमुर्लन, लसीकरण, आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याची जबाबदारी ग्रामीण रुग्णालयाची आहे; परंतु सर्व उपक्रम ग्रामीण रुग्णालयाने गुंडाळून ठेवले आहेत. ज्यांना आरोग्य सुविधा हवी त्यांनी रुग्णालयात यावे, आम्ही घरी येणार नाही, असा पवित्रा ग्रामीण रुग्णालय चालविण्यासाठी घेतलेल्या बेल एअर या संस्थेने घेतल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात येणारे हे उपक्रम कोण राबविणार, असा प्रश्न आहे.
सध्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. कोरोनाबाधितांना तालुक्यात कुठेच बेड उपलब्ध नाही. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर उपलब्ध नाही, अशी स्थिती आहे. अशावेळी बाहेरगावी रुग्ण पाठविताना ग्रामीण रुग्णालयाचे पत्र लागते. तेही वेळेवर मिळत नसल्याने रुग्ण व नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मंगळवारी एका ७६ वर्षीय महिला रुग्णाची उपचारांअभावी हेळसांड झाली. उशिरा का होईना वृद्धेला रुग्णवाहिकेमधील ऑक्सिजन देण्यात आल्याने रुग्णाचा जीव वाचला.
ग्रामीण रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकारी व तीन नर्स यांच्या जागा रिक्त असल्याने आम्ही शहरात काम करू शकत नाही, असा खुलासा बेल एअरच्या फादर टाॅमी यांनी केला; परंतु आम्ही ग्रामीण भागात सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्व उपक्रम चांगल्या प्रकारे राबवत आहे, असा दावाही फादर टाॅमी यांनी केला आहे. रिक्त जागांसंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांशी वारंवार चर्चा झाली आहे. पत्रव्यवहारही केला आहे. परंतु कोणी गांभीर्याने पाहत नाही, असेही फादर टाॅमी यांनी सांगितले.
चौकट
मंत्री खासगी दौऱ्यावर
पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई तालुकास्तरावर अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सर्वत्र कारोनाची स्थितीचा आढावा घेत आहेत. बैठकावर बैठका घेऊन दमल्यानंतर केवळ विश्रांतीसाठी महाबळेश्वरला येतात. येथे आल्यानंतर पत्रकारांनी विचारले तर ते खासगी दौऱ्यावर आहेत एवढेच सांगितले जाते.