नागनाथवाडीत पुजाऱ्यांकडील पाच नागांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:38 PM2019-08-18T23:38:56+5:302019-08-18T23:38:59+5:30
पुसेगाव : नागनाथवाडी येथील ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून नागनाथ मंदिराच्या गाभाºयात होत असलेल्या सर्पदर्शनाची प्रथा थांबविण्याचा निर्णय घेतला. तरीही मंदिरातील ...
पुसेगाव : नागनाथवाडी येथील ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून नागनाथ मंदिराच्या गाभाºयात होत असलेल्या सर्पदर्शनाची प्रथा थांबविण्याचा निर्णय घेतला. तरीही मंदिरातील पुजाऱ्यांनी नाग बाळगल्याची माहिती वन विभागास मिळाली. त्यांनी रविवारी दुपारी एक वाजता मंदिरात छापा टाकून तिघांकडून पाच नागांची सुटका केली.
अजय बजरंग गुरव (वय ४७), विजय बजरंग गुरव (५०) व प्रज्ञा प्रदीप गुरव (३८, तिघे रा. नागनाथवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
नागनाथवाडीमधील मंदिरात अनेक वर्षांपासून श्रावण महिन्यातील सोमवारी येणाºया भाविकांच्या हातात नागाची लहान पिल्ली दिली जातात. त्यामुळे भाविकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात, असा समज होता. भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन नागाची लहान पिल्ली गाभाºयात सोडली जात होती. त्यातून अंधश्रद्धेला खतपाणी घालून मोठ्या प्रमाणात लूटही केली जात होती. याबाबत कोरेगावमधील सर्पमित्र योगेश धुमाळ व अंनिसचे कार्यकारी संघटक हेमंत जाधव यांनी चार वर्षांपूर्वी आवाज उठवून ही प्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला. कोरेगाव उपविभागाच्या पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी गतवर्षी प्रथा बंद करण्यासाठी संबंधितांना सूचनाही दिली होती. तरीही त्यांनी ही प्रथा सुरूच ठेवली होती.
यावर्षी मात्र श्रावण उत्सव सुरू होण्यापूर्वीच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुसेगाव पोलीस ठाण्याला निवेदन देऊन ही प्रथा तातडीने बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मागील आठवड्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर, सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, नागनाथवाडीतील ग्रामस्थांची एकत्रित बैठक झाली. यावेळी ग्रामस्थांनी ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. श्रावणातील पहिल्या व दुसºया सोमवारी ही प्रथा बंद करण्यात आली. मात्र, तिसºया श्रावणी सोमवारचे औचित्य साधून येथील पुजाºयांनी पुन्हा गावची प्रथा सुरू करण्याचा प्रयत्न केला.
यावर उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली वडूजचे वनक्षेत्रपाल अजित साजने, साताºयाचे वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे, पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, वन कर्मचारी व पोलिसांनी छापा टाकला. यावेळी नागनाथ मंदिरातील अजय गुरव, विजय गुरव व प्रज्ञा गुरव यांच्याकडे पाच नाग जातीचे लहान सर्प आढळून आले. त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.